पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाऊ विश्वासराव व गोपाळराव यांना पश्चात्ताप होतो. दुभंगलेलं कुटुंब एक होतं.
 अशी सुखान्त, आदर्शवादी कथा घेऊन लिहिलेली ही कादंबरी प्रशांत दिवटे यांच्या तारुण्यसुलभ आदर्शोन्मुख वास्तववादाची निर्मिती होय. खेड्यातील कुटुंब एका आड्या, छपराखाली एकत्र राहात असलं तरी एक नसतं. रोज घडणा-या घरगुती गोष्टींची हेवादाव्याची धग व जगण्याची दगदग याचा परिणाम म्हणून एका रक्ता, नात्याची माणसं सत्ता, संपत्ती, स्वार्थ इ. मुळे एकमेकांचे नुसते स्पर्धकच होत नाही तर वैरी होऊन जिवावर उठत असतात. संपतरावांच्या कुटुंबाची वाताहत याचीच परिणती असते. ज्या कुटुंबातील आई-वडिलांना वनवास मिळतो त्यांची रामसारखी मुलं आपल्या पालकांची जगण्याची ‘दगदग' रोज अनुभवत असतात. त्यामुळे मुळात जगण्याचा नवोन्मेष जन्मतो. ती जिद्दी होतात. जिद्दीच्या जोरावर कष्टांवर, संकटांवर मात करून स्वप्न साकार करतात. याचं आश्वासक चित्र या कादंबरीत असलं तरी प्रत्यक्ष समाजजीवनात ते लीलया घडताना दिसत नाही. त्याचं कारण सामान्य माणूस स्वतःचा स्वार्थ व कुटुंब यापलीकडे पाहण्यास तयार नसतो.
 प्रशांत दिवटे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या रूई-छत्रपतीसारख्या खेड्यात जन्मले, वाढले. ते अजून पदवीधर नाहीत. मिळवतही नाहीत. घरी श्रीमंती नसली तरी सुख आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचे त्यांच्याकडे एक भाबडं मन आहे. जीवनाच्या कटुतेचा अनुभव नसलेलं मन भाबडं असतं. भाबड्या मनाला जग सुंदर व्हावं, माणसं मौल्यवान, प्रेमळ, नि:स्वार्थी असावी असं वाटत असतं. असं वाटण्याच्या वयातील ही कादंबरी असल्याने ती एकीकडे जगण्यातली दगदग व्यक्त करते व दुसरीकडे स्वप्नांचा आरसेमहाल कल्पत असते. अशा एका भ्रामक, कल्पित शुभाकांक्षी मनाची निर्मिती असलेली कथा विधायक जगाचा पाया घालू मागते आहे.

 अण्णा हजारे लोक आंदोलनातून जो नवा भारत घडवू पाहतात त्याचा मूलाधार तरुण आहेत. बाबा आमटेंनी तरुणाची व्याख्या करताना तरुण खांद्यावर तरुण शिर असलेला' अशी केली होती. उद्याचं जग विधायक व्हायचं तर आपली मनोवृत्ती सकारात्मक, रचनात्मकच असायला हवी हे दिवटे यांची ही कादंबरी समजावते. ती वाचत असताना माझ्या मनात दोन ओळी आल्या

प्रशस्ती/१०५