पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पावसाळ्यात निवडणुका घेऊ नयेत असा आजपर्यंत पाळला गेलेला संकेत या निवडणुकांत दूर ठेवला गेला.
 पंधरा सोळा महिन्यांच्या अवधीत निवडणुका आल्यामुळे मतदारांत आधीच उदासीनता होती. पावसाळ्यात मतदानाच्या तारखा आल्यामुळे अनेकांना मतदानास जाण्याची सवड होणे शक्य नव्हते. निवडणुकीत मतदान कमी झाले; कधी नव्हे इतके कमी झाले; पण त्यापलीकडे मतदानात शेतीवर अवलंबून असलेल्यांचा सहभाग विशेष कमी राहिला. या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या पक्षांनी काढलेल्या जाहीरनाम्यांत शेतकरी आणि शेती हे दोन्ही विषय आधीच बाजूस टाकले गेले होते; मतदानातही शेती आणि शेतकरी बाजूस राहिले.
 राजीव गांधींच्या हत्येच्या आधी झालेले मतदान आणि हत्येनंतर झालेले मतदान यांत मोठा फरक पडला. सहानुभूतीची लाट म्हणायची की आणखी काही दुसरे नाव वापरायचे; पण २० ते ते १२ जून या काळात इंदिरा काँग्रसेच्या उमेदवारांना १० % पर्यंत अधिक मते घेता आली, हे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. आंध्र प्रदेशात २० मे रोजी झालेल्या निवडणुकीत तेलगू देशम् आघाडीवर राहिली आणि इंदिरा काँग्रसचा जवळजवळ सफाया झाला. या उलट १५ जून रोजी झालेल्या मतदानात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर राहिले. उत्तर प्रदेशात इंदिरा काँग्रसचा अगदी धुव्वा उडाला. भारतीय जनता पक्षाने तेथे एक तृतीयांशापेक्षा जास्त मते मिळवली. काँग्रेसला फक्त १८ % मते मिळाली; पण जून महिन्यातील मतदानात काँग्रेसला २४ % पर्यंत मिळाली. राजीव गांधींच्या हत्येचा आणि त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचा फायदा काँग्रेसला मिळाला हे उघड आहे.
 याच्या उलट, या परिस्थितीचा सगळ्यांत जास्त तोटा जनता दल आणि राष्ट्रीय मोर्चास झाला. राजीवजींच्या हत्येस जबाबदार कोण आणि द्र.मु.क.चा हात किती, याबद्दल बेजबाबदार विधाने करण्यात आली. राष्ट्रीय मोर्च्याच्या नेत्यांच्या घरांवर अनेक ठिकाणी हल्ले झाले. यापलीकडे जनता दल आणि राष्ट्रीय मोर्चा यांना मतदानाच्या तारखा पुढे ढकलणे फारच महाग पडले. त्यांच्याकडील पैसा आणि साधने आधीच अपुरी. प्रचाराचा कालखंड एकदम दुप्पट झाल्यावर त्यांच्या अनेक उमेदवारांना वाढलेल्या मुदतीत घरी बसून राहण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप आणि त्यांचे दोस्त पक्ष यांना झाला.

 निवडणूक निकालामध्ये घडलेली एक आल्हाददायक गोष्ट समाजवादी जनता दलाचा सपशेल पराभव. पराभव होणार हे पहिल्यापासून स्पष्टच होते. महाराष्ट्रात

पोशिंद्यांची लोकशाही / ३२