Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म, बालपण व शिक्षण.

आषाढ शु॥ अष्टमीस झाला. त्यांच्या आईचें नांव यमुना. बालपणी त्यांची वृत्ति कशी होती, ते काय खेळत, कसे वागत वगैरे माहिती आम्हांस नाहीं. त्यांचें प्राथमिक शिक्षण वडगांव येथें झालें. राजवाडे यांच्या पितामहानें स्वराज्याच्या पडत्या काळांत लोहगडची किल्लेदारी केली होती. तेव्हां याच बाजून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील बालपणींच निवर्तले. यामुळे त्यांचें लहानपणी संगोपन शिक्षण वगैरे त्यांच्या चुलत्यांनीं केलें. राजवाडे यांनी स्वतः 'कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव' म्हणून ग्रंथ मालेमध्ये एक लेख पुष्कळ वर्षांपूर्वी लिहिला आहे. त्यावरून त्यांच्या सर्व शिक्षणाची माहिती मिळते. आठ वर्षे वयाचे असतां त्यांनी धुळाक्षरें शिकण्यास आरंभ केला. त्यांनी हे मराठी शिक्षण ३ वर्षे घेतलें. येवढ्या काळांत त्यांनी कधी शाळेत जाऊन तर कधीं घरी राहून सामान्य मराठी पुस्तक वाचण्याइतकें भाषाज्ञान व केरोपंती अंकगणितांतील वाटेल तो प्रश्न सोडविण्याची तयारी हें संपादन केलें, या तीन वर्षांत भूगोल, इतिहास, व्याकरण, व्युत्पत्ति, भूमिति, काव्य यांची बिलकूल कल्पना त्यांस नव्हती; या गोष्टींचा त्यांच्या बालमनावर ठसा कांहींच उमटलेला नव्हता. या तीन वर्षांत ते शाळेत सरासरीने दीडवर्षे गेले असतील; बाकीचे सर्व दिवस धांगडधिंगा, मस्ती कुस्ती करण्यांत त्यांनी दवाडले. मारामाऱ्या करण्यांत त्यांचा पहिला नंबर असे; विटी-दांडूचा खेळ खेळण्यांत तर ते तरबेज. पोहण्यांतही चांगलेच प्रवीण झाले. एकही शिक्षक या बालवयांत नीट शिक्षण देणारा त्यांस मिळाला नाहीं. ते या आत्मचरित्रांत सांगतात "पंतोजी आडमुठे, पोटभरू, इकडची पाटी तिकडे नेऊन टाकणाऱ्यांपैकी होते."