Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संपादकीय.


 मालेचे सहावें पुष्प 'आदर्श शिक्षण' या पुस्तकांतील निवेदनांत प्रारंभिक निधि ५००० रु. मिळाल्यास स्वतंत्र पुस्तकें प्रसिद्ध करण्याचेंही कार्य माला अंगिकारिल असा उल्लेख मी केला होता. पण प्रारंभिक निधि जरी मिळाला नसला तरी माला आज सर्वस्वीं स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचे धाडस करीत आहे. प्रस्तुतचे पुष्प अमळनेरच्या खानदेश शिक्षण मंडळाच्या हायस्कुलांतील विद्वान शिक्षक व गोखले चरित्र व ईश्वरचंद्र विद्यासागर या पुस्तकांचे कर्ते श्री. पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलें आहे. गेल्या जानेवारी महिन्यांत अमळनेरला गेल्यावेळी श्री. साने यांच्याशीं प्रथमच परिचय झाला व पहिल्या भेटीतच केलेल्या विनंतीचा स्वीकार करून त्यांनीं मालेसाठीं राजत्राडे चरित्राचें लिखाण पूर्ण केलें याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. पुण्याचें इतिहाससंशोधन मंडळ हें कै. राजवाड्यांचें एक जिवंत स्मारकच आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. या मंडळाचें काम सुरुवातिपासून गु. दत्तोपंत पोतदार हे एकनिष्ठपणे व निरलसपणे करीत आले आहेत. अर्थातच गु. पोतदार यांस कित्येक वर्षे कै. राजवाड्यांच्या सहवासांत राहण्याचें भाग्य मिळाले आहे. अशा अधिकारी व्यक्तीची या पुस्तकास प्रस्तावना मिळाल्यास विशेष उचित होईल असे वाटल्यावरून मी व श्री. साने यांनी त्यांस प्रस्तावना लिहिण्याबद्दल विनंती केली. विनंतीप्रमाणें आपला अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी सुंदर प्रस्तावना लिहून दिली यांत त्यांची राजवाडे- भक्तिच विशेषत्वाने प्रगट