पान:पुत्र सांगे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वर्गस्थ देवतेची बांधली आहे. एका अर्थाने निराकार भक्ति. निरपेक्ष भक्ती.

 अमेरिकन मानसिकतेची प्रचंड मगरमिठी बसलेल्या आजच्या समाजव्यवस्थेत, अंगावरचा कपडा बदलावा इतक्या सहजपणे नवरा-बायको एकमेकांना ‘टाकून' देताना दिसतात. अशा परिस्थितीत आमच्या आई-वडिलांचं सहजीवन आणि विशेषतः आमच्या दादांची पत्नीवरील विलक्षण निष्ठा, कोणाला तरी 'बोलून' दाखवावी असं फार फार वाटू लागलं तेव्हा या पुस्तकाची कल्पना मनात रुंजी घालू लागली.

 आणखी एक सहजयोग आला. १९७८ मध्ये दादा असताना, टिळक परिवारातर्फे आम्ही सांगली नगरवाचनालयास आमच्या आईच्या स्मरणार्थ देणगी दिली होती. त्यामधून वाचनालय १९७८ पासून कै. इंदूमती टिळक गीतगायन स्पर्धा अत्यंत आपुलकीने प्रतिवर्षी आयोजित करते. त्या स्पर्धेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ते औचित्य साधून आई-दादांचं पुण्यस्मरण करावं. म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. दादा 'दक्षिण महाराष्ट्र' या साप्ताहिकातून अग्रलेख लिहित असत. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचे चार अग्रलेख आणि आईच्या काही कविता मुद्दाम पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. पुस्तकात द्विरुक्तीचा दोष आहे हे मी प्रथमत:च मान्य करतो. जाणूनबुजून मी तो तसाच राहू दिलाय. व्हायचं काय तर एखादी वेगळी हकीगत सांगण्याच्या ओघात त्याचा काही भाग आधी आलाच आहे, तो अमुक पानावर आहे, असं सांगणं प्रशस्त वाटेना. निवेदनाचा ओघही खंडित व्हायचा. त्यामुळे कांही उल्लेख पुन्हापुन्हा आले आहेत. व्याकरणाच्याही काही चुका आहेत. त्याबद्दल क्षमा असावी.

 अर्थात हे काही सार्वजनिक वितरणासाठी निर्मिती झालेलं पुस्तक नाही. आई वडिलांना आदरांजली हाच एकमेव हेतू.

 या पुस्तकाची छपाई आणि मुखपृष्ठ जिव्हाळ्याने करणाऱ्या, पाटणकर झेरॉक्सचे श्री. आनंद पाटणकर यांना तसेच दादांचे जुने लेख मिळवून देण्यासाठी अगत्यपूर्वक मदत करणारे श्री. रविंद्र बिनिवाले यांना मनःपूर्वक धन्यवाद.


अविनाश टिळक

२ ऑक्टोंबर, २००३
१/८, राजवाडा, सांगली.