पान:पुत्र सांगे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हे सांगायला हवं !

 माझे माता-पिता हे चार चौघांसारखेच सामान्यजन होते. तरीही त्यांचे चरित्रगान करावं असं मला का वाटावं ? कुणालाही पडेल अशा प्रश्न मलासुध्दा पडला होता. निव्वळ आई-वडिलांचं प्रेम म्हणावं तर ते सर्वांनाच असतं. लेखनाची ऊर्मी म्हणावी तर त्यासाठी माझ्यासमोर अनेक विषय आहेत. असं असताना हे छोटं पुस्तक लिहिण्याचा खटाटोप मी का करावा ? तेच सांगतोय.

 माझ्या आईचे निधन तिच्या ६० व्या वर्षी झाले. त्यावेळी माझ्या वडिलांचं वय होते ६४ वर्षाचे. दोघेही शिक्षकपेशाचे होते. दोघांनाही पेन्शन होती. दोन्ही मुलं म्हणजे मी रिझर्व्ह बँकेत आणि माझा धाकटा भाऊ स्टेट बँकेत. अशा परिस्थितीत उर्वरीत दिवस सुखात घालवावेत. आनंद-पर्यटन करावे. मनात रुजत असलेल्या शैक्षणिक प्रकल्पांची पूर्ती करण्याचा प्रयत्न करावा अशा मनोरथांमध्ये मग्न असतानाच अचानक आईवर कॅन्सरचा घाला पडला. आजाराचे निदान झाल्यापासून सव्वा वर्षातच तिचं निधन झाले. दादांच्या दृष्टीने तो वज्राघातच होता. त्यांतून ते सावरलेले दिसले ते केवळ त्यांच्या दोन्ही सुनांमुळे, सौ. सुमन व विशेषतः सौ. चारुमुळे, सख्ख्या मुली काय करतील अशा आंतरिक जिव्हाळ्याने त्यांनी दादांचे संगोपन केले. म्हणूनच दादा पुढे ११ वर्षे जगले. ते जगले असं मी म्हणतोय ते काही खरं नाही. आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने ते मनोमन होरपळून गेले होते. मग कदाचित विरंगुळ्यासाठी असेल पण त्यांचा त्यानीच स्वत:साठी एक मार्ग शोधला. तो म्हणजे डायऱ्या लिहिण्याचा. आपल्या स्वर्गस्थ पत्नीला उद्देशून ते रोजच्या रोज एक पानी स्वगत लिहित. आपली इंदू समोर बसलीय आणि आपण तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय, रोजच्या घडामोडी तिला सांगतोय, जुन्या आठवणी उगाळतोय अशा थाटाचं हे लिखाण आहे. या एकतर्फी संवाद लेखनात आणि नंतर ते सुखसंवाद वाचण्यात, त्यांचा जो काही वेळ जाई, मला वाटतं, तेवढचं त्यांचं खरं 'जगणं' होतं ! इतरांच्या दृष्टीने निव्वळ खटाटोप वाटावा असा हा उद्योग त्यांनी सतत ११ वर्षे म्हणजे जवळजवळ ४००० दिवसाहून अधिक काळ केला. मुलगा म्हणून नाही तर एक त्रयस्थ म्हणून सुध्दा ही गोष्ट मला विलक्षण वाटली. आपल्या इंदूमती साठी केलेला हा एक 'अज - विलाप'च आहे. अत्यंत समरस होऊन इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत असे संवाद मृतपत्नीशी केल्याचे उदाहरण माझ्या तरी ऐकीवात नाही. समोर देवाची मूर्ती ठेवावी आणि जगाला पूर्णतया विसरुन भक्ताने वर्षानुवर्षे त्या देवाची आराधना करावी तशाच स्वरुपाची अहर्निश पूजा आमच्या वडिलांनी आपल्या