पान:पुत्र सांगे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री गणपतिमहाराजांनी आपली सोंड फिरवली तर..... !

 बुधवार दि. ८/१२/७१ ची सुप्रभात उगवली. भारतीय सेनेने पश्चिम आघाडीवरहि शत्रूला निष्प्रभ केले. पाक विमानांचा आणि रणगाड्यांचा विध्वंस झाला. भारताच्या सरसेनानीनी बांगला देशांतील पाक सेनेला शरण येण्याचा आदेश दिला. अशा प्रकारच्या मोठमोठ्या मथळ्याच्या युध्दाच्या रोमांचकारी व उत्साहवर्धक वार्ता स्थानिक दैनिकांतून वाचत असताना आमचे भान अगदी हरपून गेले. परत भानावर आल्यावर त्याच दैनिकांत आम्ही सांगलीच्या मा. दंडाधिकारी (जिल्हाधिकारी) यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्द झालेले एक प्रकट सूचना विज्ञापन वाचले. ते वाचत असतानां कोणीतरी तापलेली सळई आमचे डोळ्यांत खुपसत आहे असे आम्हांस वाटले. त्यामुळे मनांत कमालीची विषण्णता, कांहीशी चीड, पुष्कळसा सात्विक संताप आदि संमिश्र भावनांचा कल्लोळ माजून राहिला. मा. दंडाधिकाऱ्यांच्या प्रसिध्द झालेल्या विज्ञापनाचा इत्यर्थ असा की सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांना श्री गणेश्वरी चौकात वा उत्तरेकडील मोकळ्या जागेत सिनेमा थिएटर बांधावयाचे असून त्यास कोणाची हरकत नाही असा दाखला महाराष्ट्र सिनेमा रुल्स १९६६ नियम ४ नमुना ब अन्वये देणेचा आहे. या प्रकरणास कोणाची हरकत असल्यास त्यानी एक महिन्याचे आंत म्हणजे दि. ८ जानेवारी १९७२ पूर्वी ती, मा. दंडाधिकारी यांचेकडे देणेची आहे. युध्दाच्या पार्श्वभूमीवर हे विज्ञापन वाचून सर्व स्त्री पुरुष नागरिकांमध्ये अस्वस्थता व खळबळ माजून राहिली. युध्दाच्या विजिगीषु वार्ता वाचून, ऐहिक वैभवावर लाथ मारुन रणांगणाकडे धांव घेणाऱ्या पटवर्धन घराण्यातील पूर्वजांच्या शूर पुरुषांच्या पराक्रमाच्या आठवणी जागृत झाल्या आणि त्याच वेळी सहस्त्रावधी स्त्री पुरुष नागरीकांचे पिढ्यान पिढ्या श्रध्दास्थान असलेल्या श्रीगणपति मंदिराच्या पावन परिसरातील श्रीकेंगणी चौकात त्याच घराण्यातील वंशजाने सिनेमा थिएटर बांधण्याची योजना करावी या विषयी खेद आणि संताप वाटला.

 श्रीमंत विजयसिंह पटवर्धन हे श्रीगणपति पंचायतन संस्थानचे एकमेव

(४५)