Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 पीटर दि ग्रेट

पीटर दि ग्रेट हा इ० सन १६७२ मेच्या ३० तारखेला जन्मला. रोमॅनोव् राजवंशांतील हा चवथा पुरुष होय. प्रत्यक्ष शककर्ता जरी नव्हे, तरी रशियन इतिहासांत एका नव्या काळाचा कर्ता व पौर्वात्य रशियाला पाश्चिमात्य रशिया बनविणारा असा हा मोठा जबरदस्त वीर होऊन गेला. याचा आजा मायकेल रोमॅनोव् हा इ० सन १६१३ त रशियाच्या गादीवर बसला. याच्या आधींच्या काळांत या भिन्नवंशीय लोकांच्या देशांत अनेक उत्पात होऊन गेले होते. अगोदर सध्यांच्या रशियाच्या उत्तरेचा बहुतेक सगळा भाग उजाडच होता. खरी वसति काय ती पश्चिम व दक्षिण या दिशांसच होती. तेथेंही स्लाव जातीचे लोक मुख्यतः असत आणि आहेत. हे स्लाव कोणाच्या मतें मोगल व कोणाच्या मतें इराणी असे आहेत. शक, मेद इत्यादि जातींचा उल्लेखहि त्यांच्यासंबंधीं लिहितांना केला जातो. कसेही असले तरी चरित्रनायकाचा राजवंश स्थापित व्हावयाच्या वेळीं स्लाव हेच तेथें मुख्य लोक होते. तेराव्या शतकापासून तों पंधराव्या- पर्यंत या लोकांवर मोगल लोकांचें मोठें करडें राज्य चालू होतें. पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटीं त्यांचा अंमल अगदीं बसला. कोठें कोठें कांहीं नाकीं शिल्लक राहिली, इतकेंच. मोगली अम्मल म्हणजे इतका जाचाचा झाला होता कीं, सोय नाहीं. सर्व देशभर या रानवटांच्या टोळ्या बेदरकार हिंडत राहात व पिकें, मेंढरें, गुरें हांकून नेऊन शेवटी माणसेंही मुस्क्या बांधून हे दक्षिणेकडे पिटाळीत नेत व क्रिमिया द्वीपकल्पांत एका प्रचंड गुलामांच्या बाजारांत त्यांची विक्री करीत असत. असें अडीच तीन शतके चाललें होतें. शेवटीं एकदां त्यांचें बळ कायमचें मोडलें. तेव्हांपासून इ० सन १६०० पर्यंतच्या