Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१
कोलंबस
 

कराव्या, सोन्याच्यामागें पळावें, गुलाम नेऊन विकावे, नव्या मुलुखाचें नामकरण करावें, हाच काय तो कार्यक्रम. दुसऱ्या सफरीसच तेथील लोकांच्या ध्यानीं आलें कीं, हे लोक बदमाष आहेत. एक कोलंबस नसेल दुर्वृत्त; पण बरोबरचे खलाशी व स्वदेशांत नकोसे झालेले लुच्चे हे महा पागल असत. आपल्या सुधारलेल्या शस्त्रास्त्रांनी ते त्यांस हैराण करीत व त्यांचे सोनेनाणें बुचाडून वर ते त्यांच्या बायकाही फुसलावून नेत. कोलंबसाचें हें नवें युग खरें; पण खुद्द मूळ अमेरिकनांस हळुहळू चेंपीत नेणारें आणि शेवटीं भूतलावरून निखालस निपटून टाकणारें हें प्राणसंकटच होतें. कोलंबस स्वतः या बाबींत फार मर्यादेनें व सचोटीनें वागत असे. पण बरोबरचे लोक त्यास आवरत नसत. कित्येकदां ते त्याजवरच उसळून उठत; पण या बाबतीत जरी तो भला होता तरी दुसऱ्या एका महापातकी संस्थेचा आरंभही त्याच्याच हातून झाला. नवीन स्थापिलेल्या वसाहतींचा खर्च भागावा आणि खजिन्यांतही भर पडावी म्हणून त्याने राजास पत्र लिहून सुचविलें कीं, क्यारिबियन बेटावरचे नरमांसभक्षक लोक यूरोपांत धरून न्यावे व तेथें गुलाम म्हणून विकावे! व्यापाराला हा उत्तम माल आहे! पण पत्र लिहितांना तो येवढ्यावरच थांबला नाहीं. दुष्ट कृत्य सोज्ज्वळ करण्याची कलाही त्याला साधली होती. त्यानें लिहिलें, हे अज्ञ लोक तिकडे विकले गेले म्हणजे ख्रिस्ती होण्याची संधि त्यांस सहजच मिळेल व अशा रीतीनें राजाचा स्वार्थ व गुलामांचा परमार्थ एकदमच साधतील! एका सफरींत तर त्यानें कित्येक मण सोनें, स्वादिष्ट फळें याबरोबरच राजधानींत विकावयासाठी पांचशें इंडियन गुलाम जहाजें भरून पाठविले! सोन्याचा हव्यास तर त्याला इतका सुटला कीं, तिकडे "चवदा वर्षांवरील प्रत्येक माणसानें दर तीन महिन्यांस चार पांच तोळे सोनें गोळा करून दिलेच पाहिजे" अशी सक्ति त्यानें केली होती! जे प्रतिष्ठित