Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३५
कोलंबस
 

 तीनही जहाजांच्या तांडेलांस त्यानें हुकूम केला कीं, थेट पश्चिमेकडे चलावें. खलाशांचे भय वाढत जाऊं नये म्हणून त्याने एक हिकमत योजिली. आपण फार अंतर तोडीत चाललों नाहीं असें त्यांस वाटविण्यासाठीं त्यानें अंतर मोजण्याची दोन मापें केलीं. खरें आपल्यापाशीं व खोटें सर्वांना दिसेसें. प्रत्येक दिवशींच्या मैलांतून अमुक एक वजा करून उरलेला आंकडा मात्र पाटीवर लावावा असा त्याचा क्रम असे. सप्टेंबर ता. १३ ला होकायंत्राची सळई सरळ राहीनाशी झाली. प्रथम त्यानें हें कोणास दिसूं दिलें नाहीं; पण सुकाणूंवाल्यांच्या तें लवकरच ध्यानांत आलें व सर्व जहाजांवर जिकडे तिकडे खळबळ झाली. कारण सळई वांकडी झालेली त्यांनीं कधीं पाहिली नव्हती. अर्थात् दिशासुद्धां फिरल्या कीं काय, असें लोक कुजबुजू लागले; पण कोलंबसानें आपल्या ज्योतिषाच्या ज्ञानावर वेळ मारून नेली. तो जेव्हां नक्षत्र-तारांची नांवें व होकायंत्राचा त्यांच्याशीं संबंध इत्यादि बाबी सांगूं लागला, तेव्हां कांहींच न कळल्यामुळे त्यांनीं त्याचा बोज राखला व पडतें घेतलें. थोड्याच दिवसांत समुद्रावर फांद्या, फळें, लांकडें इत्यादि दिसली आणि तीं जिकडे जात आहेत तिकडे जावें असें कित्येकांनी सुचविलें; पण तो म्हणाला, 'हिंदुस्थान तिकडे सांपडावयाचें नाहीं, आपणांस सरळच गेलें पाहिजे'. त्याही खुणा पुढें दिसेनाशा झाल्या. दिवसांमागें दिवस व रात्रींमागें रात्र यावी व जावी असें झालें. वर आकाश व खालीं पाणी यांशिवाय तिसरा पदार्थ नाहीं असें झालें. त्यांना वारा फार अनुकूल होता व त्यामुळें प्रवास जलदीनें चालू होता. पुष्कळांना शंका येऊ लागली कीं, कप्तान खोटे मैल लावीत असावा. शेवटी हा अनुकूल वाराच त्यांना शत्रु वाटू लागला. कारण पश्चिमेकडून वारा मुळींच येईना. त्यांना वाटे कीं, आपणांस परत वळतां यावयाचे नाहीं. पूर्वेकडूनच जर वारा वहात राहिला तर उरफाटें फिरतां तरी
 पु. श्रे... १०