Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१३४
 

सग्यासोयऱ्यांचे व बायकापोरांचे थवेच्या थवे जमा झाले. राजानें हें काय ओढून आणिलें आणि आमचीं माणसें आम्हांला अंतरविली म्हणून जिकडे तिकडे रडणींभेंकणी चालू झालीं. खुद्द खलाशीही नशिबाला हात लावून बायकापोरांकडे शेवटचें पाहून कामाला लागले. खरा कार्योत्साह काय तो कोलंबस व त्याचा दुय्यम पिंझो यांच्या मनांत होता. अशा रीतीनें मनांत कल्पना आल्यापासून धडपड करीत असतां अठरा वर्षांनीं कोलंबसास अनुकूलता प्राप्त झाली! दुसरा एखादा कमी धीराचा माणूस दारिद्र्य, अवहेलना, अवमान व दुःख यांनी खचून जावयाचा; पण कोलंबस खरा तत्त्वनिष्ठ होता आणि खरा धर्मश्रद्धाळू होता. त्याच्या मनांत अशी खोल आकांक्षा होती कीं, नवी भूमि शोधून काढीन, पुष्कळ धन मिळवीन आणि त्याच्या जोरावर फौजा उभारून ख्रिस्त्यांचें पवित्र स्थान जे येरुशालेम तें मुसलमानांच्या हातून सोडवीन. कोलंबसाच्या चारित्र्याचा हा भाग अत्यंत बोधप्रद आहे. एकेका गोष्टीचें असें वेड लागल्याशिवाय कार्ये तडीस जात नाहींत हें यावरून स्पष्ट दिसतें.
 इ० सन १४९२ ऑगस्ट ३ रोजीं या सफरीसाठी कोलंबसानें जहाजें हांकारिलीं. सप्टेंबर ता. ९ ला पोर्तुगीज लोकांचे फेरो बेट त्याला लागलें. तेथून पुढे सगळा समुद्र केवळ अज्ञातच होता. जमीन दिसेनाशी झाल्यावर खलाशी जास्तच हिरमुसलेले दिसूं लागले. त्यांना मारूनमुटकून जहाजांबरोबर पिटाळलेलें होतें. त्यांच्या मनानें खास घेतलें कीं, आतां आपण घरादारांस मुकलों. मर्दासारखे मर्द पण ते बायकांसारखे रडूं लागले. कप्तानाने त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगून पाहिल्या. जेथें पोंचावयाचे ते देश कसे सुंदर आहेत, तेथील जमिनी कशा सुपीक आहेत आणि सोनें तर किती सुलभ आहे इत्यादि अनेक काल्पनिक वर्णनें त्यानें केली; पण त्यांना वाटे कीं, सगळे जगलों वांचलों तर मिळावयाचें.