Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१२२
 

असल्या आकस्मिक रीतीनें झालेले नसून, आपलें गांव सोडून तो बुद्धिपुरस्सरपणें तेथें गेला होता. त्यांचें म्हणणें कीं, जिनोआ शहरी असतां त्याला भूगोल-विषयक ज्ञानाची व देशपर्यटनाची फार हौस उत्पन्न झाली होती. आणि तेव्हांच्या काळीं आफ्रिकेचा पश्चिम- किनारा शोधून काढणें, हिंदुस्थानास मार्ग शोधून काढणें, ज्या कांहीं खळबळी समुद्रकांठच्या लोकांत चालू होत्या त्यांत त्याचें मन गर्क झालेलें असे. त्याच्या स्वतःच्या म्हणून ज्या कांहीं कल्पना होत्या त्या तपासून पहावयास व जमल्यास त्या अमलांत आणण्याची संधि साधावयास मुद्दाम घरून उठून तो पोर्तुगाल देशांत गेला. त्यानें पुढें जें कांहीं महत्कार्य केलें त्याच्याशीं ही कल्पना चांगली जुळत असल्यामुळे हीच बरोबर असावी व हा वेळपर्यंत तो म्हणजे एक नुसता भटक्या मारणारा चांच्याच नसावा असें मानण्याकडे आपला कल होतो. पण तेवढ्यामुळे म्हणजे संगतवारपणामुळे हाच इतिहास खरा आहे असें निश्चित म्हणतां यावयाचें नाहीं. दर्याचं व खुष्कीचें चांगलें ज्ञान असल्याशिवाय माणूस चांचेपणा तरी कसा करील? शिवाय तेव्हां चांचेगिरींत कांहीं लाज अशी उरलीच नव्हती, अथवा उत्पन्नच झाली नव्हती. पोर्तुगाल देशांत आल्यानंतरच तेथील भूगोल- शोधविषयक चळवळी ऐकून त्याचें लक्ष त्याजकडे जोरानें वेधलें असेल. हा वेळपर्यंत तो तरी वयाने लहानच होता व आपले सर्व जीवित चाचेगिरी करीतच दवडावयाचें असाही कांहीं त्याचा निश्चय झाला होता असें नाहीं. कसेंही असो. आगंतुकरीत्या तो पोर्तुगाल देश आला असला तरी त्याला पुढे आनंदच वाटला असला पाहिजे व आपण होऊन तो आला असल्यास आपण एका फार चांगल्या राजाच्या राज्यांत येऊन दाखल झालों आहों असा त्यास अनुभव आला असेल. हा आनंद त्याला कां झाला व अनुकूल अनुभव कां आला त्याचें ज्ञान होण्यास पुढें वाचण्याची जरुरी आहे.