Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 कोलंबस

कोलंबस हा जिनोआ शहरीं इ० सन १४३५ साली जन्मला. आईबाप घरचे गरीबच असले तरी चांगले कुलवान् होते. दोन भाऊ व एक बहीण मिळून हीं चार भावंडे होतीं. कोलंबस हा बापाचा पहिलाच मुलगा असल्यामुळे त्यानें त्यास फार लहानपणींच मोठ्या हौसेने शिकवावयास आरंभ केला. लिहिणें, वाचणें, थोडे हिशेबठिशेब, व्याकरण आणि बरेचसें ड्रॉइंग या गोष्टी कोलंबसास फार लहानपणीं माहीत झाल्या. हे विषय शिकवीत असतां बापाच्या ध्यानांत आलें कीं, मुलाला भूगोलाच्या माहितीची आवड फार आहे. त्यांचें राहणेंही समुद्रापासून फारसें दूर नसल्यामुळे तितक्या लहानपणीसुद्धां आपण नावाडी बनावें अशी कोलंबसाला फार आवड वाटे. बापही भला शहाणा माणूस होता. ज्या विद्येकडे मुलाचा कल तीच विद्या त्यास शिकवली तर तें त्यास फार हिताचें होईल हें जाणून दर्यावर्दीपणाच्या कामाला जरूर तें तें ज्ञान देणाऱ्या प्याव्हिआ येथील शाळेत त्यानें त्यांस घातलें. कोलंबस तेथें भूमिति, भूगोलविद्या, खगोलविद्या व नावाडीपणा इत्यादि गोष्टी शिकूं लागला. लॅटिन भाषेचेंही थोडेंसें ज्ञान त्याला तेथें प्राप्त झालें. शाळेतील पंतोजीचें भांडवल संपतांच कोलंबसाने शाळा सोडली व दुसरीकडे कोठें मोठ्या शाळेत न जातां तो एकदम खलाशीच बनला. या वेळीं तो अवघा चवदा वर्षांचा होता. त्याच्या नातेवाइकांत कोलंबो नांवाचा एक कोणी धाडसी खलाशी होता. त्याच्या दिमतीस कोलंबस राहिला.
 त्या वेळीं इटली देशांत आणि भूमध्य समुद्राच्या सर्व कांठभर लहान लहान राज्ये पसरलेली असून प्रत्येक राजाचें म्हणून एक लहानसें आरमार असे. कांहीं धाडशी नावाड्यांनी तर कोठेही नोकरी न पत्करतां आपल्याच
 पु. श्रे... ९