Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१२०
 

हिमतीवर दहा-पांच तरांडी जवळ बाळगून, पांच-पन्नास आपल्यासारखेच धाडशी लोक पदरीं ठेवून समुद्रावर वाटमारीचा धंदा बेधडक चालविला होता. सबंध भूमध्य समुद्रभर असल्या भुरट्या वाटमारेकऱ्यांचा धुमाकूळ चालत असे. कोलंबसाचा वर सांगितलेला जो कोलंबो तो असल्या लोकांमध्येसुद्धां बडा बिलंदर म्हणून समजला जात असे. त्याच्याच शिडाखालीं समुद्रावर अहोरात्र भटक्या मारावयास कोलंबस शिकत असल्यामुळे त्याची समुद्राची भीति पार मरून गेली. इतक्या लहानपणीं मन व पोंच हींही अगदी लहान असल्यामुळे खरें भयसुद्धां लहान पोरांना नीटसें उमगत नाहीं. मन इतकेंच वाढलेले असतांना कोलंबसाला धैर्य प्राप्त झालें. इ० सन १४४९ साली त्याच्या राजानें नेपल्स शहरावर छापा घालण्याचें ठरवून एक आरमार तयार केलें आणि त्यांपैकीं जहाजांचा एक ताफा वरील कोलंबोच्या हवाली केला. कोलंबो म्हटला कीं, कोलंबस आलाच. हें दर्यावरचें झुंज चार वर्षे चाललें होतें. वल्हवणें, दूरचें न्याहाळणें, प्रसंग आला असतां दर्यांत उडी फेंकणें, जहाजावर बसून समुद्राच्या लाटा डोक्यावरून जाऊं देणें, रात्री अपरात्री जागत राहून संधि साधून शत्रूवर तुटून पडणें, असल्या गोष्टींना कोलंबस अगदी सरावून गेला. ॲटलांटिक महासागरासारख्या 'तामसी' समुद्रावर होडग्यांत बसून दोन दोन महिने बिनदिक्कत हेलपाटत राहणें, आणि खरोखरीच मुलखानिराळ्या देशांत सांपडूनसुद्धां तिथल्या राक्षसी रानट्यांना वठणीवर आणणें, असलीं जीं कामें त्याच्या हातून पुढे झालीं तीं करावयास लागणारे मनाचें व शरीराचें बल त्याला या कोलंबोच्या देखरेखीखालीं मिळालें. याप्रमाणें या धंद्यांत कोलंबस वाढत असतां कोलंबो मृत्यु पावला. त्याचा पुतण्या धाकटा कोलंबो हाही मोठा धाडशी तांडेल म्हणून समुद्रावर गाजून राहिला होता. कोलंबसाची व त्याची चांगली गट्टी जमली. हा कोलंबो असा निर्दय आणि आडदांड होता कीं,