पान:पायवाट (Payvat).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जन्मशताब्दीच्या निमित्ताने कलामूल्ये व जीवनमूल्ये यांपैकी कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी हरिभाऊंच्याएवढा मोठा कादंबरीकार मराठीत झालेलाच नाही, याची ग्वाही मोकळ्या मनाने देऊन टाकली. वामन मल्हारांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या प्रश्नाचा फेरविचार करणे शक्य होईल असे वाटते. केशवसुतांच्या लोकप्रियतेतील हे चढउतार मुद्दामच नोंदविलेले आहेत. एखाद्या प्रतिभावंताच्या वाङ्मयीन मूल्यमापनात अशा प्रतिक्रियांच्या चढउतारास निर्णायक महत्त्व नसते हे खरे, पण या चढउतारांच्यामागे काही वाङ्मयीन भूमिका असतात व त्याही वाङ्मयेतिहासात महत्वाच्या असतात. या सगळ्या क्रियाप्रतिक्रियांमधून एक सत्य शिल्लक राहते, ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हे सत्य म्हणजे केशवसुतांच्या मृत्यूनंतर आज पन्नास-पंचावन्न वर्षांनीसुद्धा आपण तितक्याच उत्साहाने त्यांच्याविषयीच्या क्रिया-प्रतिक्रियांची नोंद करीत आहोत.
 पेशवाई संपल्यानंतरच्या आणि केशवसुतांपूर्वीच्या एकाही कवीला हे भाग्य लाभलेले नाही. कुंटे, पेटकर, लेंभे, मोगरे, महाजनी, कीर्तिकर इत्यादींची नावे काव्याच्या इतिहासात नामोल्लेखापुरतीच शिल्लक आहेत. खुद्द केशवसुतांच्या पिढीतील रे. टिळक, दत्त आणि विनायक हे तिघेही कवी ज्येष्ठ, पण त्यांच्याविषयी चर्चा करण्याचा उल्हास आज कुणालाच शिल्लक नाही. या कवींची जन्मशताब्दी साजरी केली तर औपचारिकरीत्या त्यांची स्तुती करणारे काही लेख लिहिले जातीलही. पण नव्याने त्यांचा अभ्यास करण्यास कुणी प्रवृत्त होणार नाही. किंबहुना केशवसुतांच्यानंतरचे गडकरी, तांवे आणि बालकवी हे कवी सोडले तर कुणाच्याविषयी आजच्या मराठी समीक्षकांना चर्चेचा उल्हास वाटणे शक्य नाही. अभ्यासक्रमात जरी ही कवि-मंडळी अधूनमधून भेटली, तरी त्यांची मूल्यमापने कशी स्थिर आणि वादातीत होऊन गेली आहेत. १९४५ पूर्वीच्या फक्त चारच कवींविषयी आज अनुकूल-प्रतिकूल चर्चा होणे शक्य आहे. या चारांपैकी स्वतः केशवसुत हे एक आहेत; आणि उरलेल्या दोघांनी त्यांचे शिष्यत्व पत्करलेले होते. गडकरी हे स्वतःला केशवसुतांचे चेले मानीत ही गोष्ट जशी प्रसिद्ध आहे, तसे बालकवीही स्वतःला केशवसुतांचे अनुयायी मानीत ही गोष्ट प्रसिद्ध नाही.

 आरंभीच्या काळात बालकवींना विनायक आणि केशवसुत यांच्याचविषयी फार आत्मीयता वाटत असे. सृष्टीमध्ये काव्याची पूर्णता आहे, सौंदर्याची पूर्णता आहे, निसर्गात आढळणारे गायन हे खरेखुरे परिपूर्ण गायन, त्या संगीताचे दिव्यत्व आपल्या काव्यात आले पाहिजे, ही जी बालकवींची निसर्गपूजनात अनेक ठिकाणी आढळणारी बैठक आहे, ती बालकवींनी केशवसुतांच्याकडूनच मिळविलेली आहे. १९०७ साली जळगावच्या कविसंमेलनात बालकवींना 'बालकवी' ही पदवी मिळाली, हे विधान आपण नेहमी करतो. पण या विधानामुळे पूर्ण सत्य समजून येत नाही. ज्या कवितेमुळे टोंबरे यांना 'बालकवी' ही पदवी मिळाली, ती खरे म्हणजे आपण ओळखतो त्या 'बालकवी'ची कविताच नव्हती. जळगाव संमेलनापर्यंतची ठोंबरे यांची कविता जुन्या वळणाची, बोधपर, उपदेशपर आणि वैराग्यपर अशी होती. बालकवींच्या कवितेतील प्रसिद्ध निसर्ग

केशवसुत : काही प्रतिक्रिया ६९