Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तांब्यांना अनुयायीसुद्धा खूप मिळाले होते. “मागच्या कुणाचाही ज्यांच्यावर परिणाम नाही आणि समकालीनांवर व पुढीलांवर मात्र ज्याचा सर्वोत अधिक परिणाम आहे तो महाकवी, हे महाकवीचे लक्षण तांवे यांना सर्वांत अधिक लागू पडते.” असे केशवसुतांचे अभिमानी प्रा. जोग यांनीच म्हणून ठेवले आहे. केशवसुत आणि तांबे यांचा तौलनिक विचार करणारे काही फुटकळ लेखही या काळात लिहून झालेले आहेत.
 १९४५ नंतर क्रमाने नवकाव्य आकार धारण करू लागले. या नवकाव्याच्या पुरस्कर्त्यांनी तांवे, रविकिरण मंडळातील कवी व त्याआधीचे कवी या सर्वांचाच सरसकट अव्हेर केला. मराठीतील काही ज्येष्ठ टीकाकार मराठी काव्याचा आढावा घेताना तांबे यांचे नाव मुळातच गाळून टाकू लागले. नवकाव्याचे निर्माते मर्टेकर यांना केशवसुतांविषयी फारशी आस्था कधीच नव्हती. इतर सर्व कवी हे आधुनिक कवी असून त्यांचे आधुनिकत्व कालसापेक्ष आहे असे मढेकरांना वाटे. काळ जाईल तसे हे सर्व कवी प्राचीन ठरतील, कवितेच्या प्रकृतिधर्माने ठरणारे नवकवित्व फक्त बालकवींत आहे असे मकरांना वाटे. येथून मग एकेक मराठी टीकाकाराने बालकवींचा गौरव करण्यास प्रारंभ केला. काहींनी पारवा, काहींनी औदुंबर, काहींनी फुलराणी आपल्या डोळ्यांसमोर श्रेष्ठ कलाकृतीचा नमुना म्हणून गृहीत धरलेली होती. केशवसुतांच्याविषयी फारसे कुणी बोलतच नव्हते. रविकिरण मंडळाच्या कवितेवर ज्यांची अभिरुची पुष्ट झालेली आहे व त्या कालखंडात ज्यांच्या मनाची जडणघडण झालेली आहे, असे टीकाकार केशवसुतांची माफक स्तुती करत असत इतकेच काय ते! ही प्रवृत्ती भ. श्री. पंडितांच्या 'समग्र केशवसुता'त प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि मग केशवसुतांची जन्मशताब्दी आली. या शताब्दीच्या संदर्भात केशवसुतांच्या गौरवाला पुन्हा एकदा उधाण आलेले आहे. कालपर्यंत केशवसुतांची प्रेमकविता फारशी सरस नाही यावर एकमत होते. आता त्यांची प्रेमकविता इतर कुणाही मराठी कवीपेक्षा भावोत्कट आहे असे काहींनी म्हणून टाकले आहे. केशवसुतांच्या चांगल्या कवितेत ज्यांचा कधीच कोणी समावेश केला नव्हता, अशाही कवितांची मराठीतील उत्कृष्ट कविता म्हणून रसग्रहणे करून दाखविली जात आहेत. कालपर्यंत संध्या चुकेल पण बालकवींचे नाव दररोज दोन-तीन वेळा तरी तोंडातून निघालेच पाहिजे अशी ज्यांची प्रतिज्ञा होती, ते आज केशवसुतांच्या तुलनेत बालकवी कधी येणेच शक्य नाही हा मुद्दा आग्रहाने स्पष्ट करीत आहेत. एका ज्येष्ठ टीकाकाराने तर जे ज्ञानेश्वराचे मन, जे तुकारामाचे मन तेच केशवसुतांचे मन आहे असा स्पष्ट अभिप्राय देऊन टाकला आहे.

 जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा प्रकार होतच असतो. लवकरच बालकवींची जन्मशताब्दी येईल. आणि मग पुन्हा एकदा प्रतिक्रिया सुरू होईल. हरिभाऊंबद्दल हाच प्रकार झालेला आहे. १९३० नंतर फडके यांची कलामूल्ये हरिभाऊंत नाहीत हा मुद्दा जवळजवळ सर्वमान्य होता. १९५० नंतर वामन मल्हार हे हरिभाऊंपेक्षा श्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे मत निःसंकोचपणे अनेकजण देऊ लागले होते, याच सर्व टीकाकारांनी हरिभाऊंच्या

६८ पायवाट