पान:पायवाट (Payvat).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती पडते. काही दिवसांपूर्वी 'आलोचने'च्या परीक्षणकारांनी त्यांची समीक्षा जीवनवादाच्या खुंटयाभोवती फिरते आहे' असा आक्षेप घेतलेला होता. वा.ल. हे कलावादी असूनसुद्धा ते जीवनवादी असावेत असा दाट समज 'आलोचने 'च्या परीक्षणकाराचा काय म्हणून व्हावा १ हे होण्यास काही कारणे आहेत. तीही आपण समजून घेतली पाहिजेत.
 कला ही कलेसाठी आहे की जीवनासाठी, या वादाला खरे महत्त्व युरोपात पुनरुज्जीवनानंतर जी मूल्ये वाढली त्यामुळे आले. ही मूल्ये एकीकडे लोकशाहीचा पुरस्कार करीत होती, आणि दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्याचा, व्यक्तीच्या महात्मतेचा जयजयकार करीत होती. दीर्घकाळ युरोपचे जीवन चर्चच्या सर्वकष बंधनात जखडले गेलेले होते, त्याला नुकतीच वाट फुटू लागली होती. कला ही कलेसाठी आहे या भूमिकेचा मुळात अर्थ ती धर्मदासी नव्हे इतकाच होता. कलावंताने कशाचे चित्रण करावे, कशाचा पुरस्कार करावा याबाबत इतर कुणी त्याला मार्गदर्शन करू नये, कलावंताला त्याच्या आत्माभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे या भूमिकेतून 'कलेसाठी कला 'वादाचा उदय झाला. रोमँटिसिझमच्या चळवळीमुळे ही भूमिका अधिकच बलवान झाली. कलावंत सृष्टीतील सौंदर्याचा आस्वादक असतो व कलेतील सौंदर्याचा निर्माता असतो, यापलीकडे त्याचा जगाशी संबंध काय ? मला जर तारे आणि वारे यांत रमावेसे वाटत असेल, तर मी कुठे रमावे हे सांगण्याचा इतर कुणाला अधिकार काय- हा मुद्दा पुनःपुन्हा मांडला जाऊ लागला. पुढच्या काळात जर्मन तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे 'उपयोगशून्यता' हे सौंदर्याचे फारच महत्त्वाचे लक्षण समजले जाऊ लागले. या साऱ्या पार्श्वभूमीतून कला ही कलेसाठी आहे या वादाकडे पाहिले पाहिजे. जवळजवळ याच काळात क्रमाने जनतेच्या चळवळी वाढत होत्या. धर्मविरोधी भावना वाढत होती. आपणाला नको असणाऱ्या बंधनाविरुद्ध चीड निर्माण करण्याचे कार्य विनोद मोठ्या प्रमाणात करीत होता. विडंबने, उपरोध व उपहास यांचे कामच हे होते. आपल्याला हव्या असणाऱ्या घटनांचा पुरस्कारही हे वाङ्मय करीत होते. लोकशाहीत प्रचार-प्रसार व एखादी भूमिका जनतेला पटवून देणे या भूमिकेला फार मोठे महत्त्व होते. या प्रक्रियेत विनोदी, उपरोधपटू मोलियरबरोबर गंभीर व्हिक्टर हयूगो हाही एक महत्त्वाचा भाग होता. आणि म्हणून वाङ्मयाने समाजजागृती केली पाहिजे, सामाजिक प्रश्न सोडविले पाहिजेत, जीवनाचे यथार्थ चित्र लोकांच्यासमोर धरले पाहिजे अशी मागणीही तितक्याच जोरात पुढे येत होती. आज या दोन्ही बाबींच्याकडे आपण थोडे तटस्थतेने पाहू शकतो.

 असे पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कलावादाच्या नावाखाली काहीजण कलेला करमणूक आणि मनोरंजन याचे साधन बनवू पाहत होते. शेवटी जीवनाला प्रगत करण्याचे साधन म्हटले तरी काय, अगर समाजाला रमविण्याचे साधन म्हटले तरी काय, ललित वाङ्मयाचा आणि एकूण कलाकृतीचा हा साधन म्हणूनच विचार झाला. वा.ल. स्वतः कला ही कलेसाठी आहे असे मानत असले, तरी ती समाजाच्या करमणुकासाठी अगर मनोरंजनासाठी आहे हे त्यांना कधीच पटणारे नाही. कलेचे

५० पायवाट