पान:पायवाट (Payvat).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गटांतले अंतर कमी होत चालल्यासारखे वाटायला लागते. हरिभाऊंच्यासारखा मनाने समाजसुधारणेला अनुकूल असणारा कादंबरीकार देवलांच्या नाटकाची प्रस्तावना लिहू लागला म्हणजे आज जे अंतर किर्लोस्कर-देवलांत आपण मानतो ते हरिभाऊंना जाणवत नव्हते की काय, असे वाटायला लागते.
 हरिभाऊ आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, “शाकुंतलादी नाटकांप्रमाणे या नाटकात नवरसांचे अत्यंत उदात्त असे स्वरूप नाही. रमणीयतेचे उदात्तरूप येथे नसून सौम्यरूप आहे.” हरिभाऊंनी कोदंडाची तुलना पुरूरवा आणि 'मालती माधवा'तील माधव यांच्याशी केलेली आहे. दुर्योधनाशी आपला विवाह होणार म्हणून आक्रोश करणाऱ्या सुभद्रेशी जर आपण समरस होऊ शकतो, तर मग शारदेशी समरस होणे काय कठीण आहे असा विचार त्यांच्या मनात येतो. त्यांना महाश्वेता आणि पुंडरीकाची स्वर्गीय प्रेमकथा लिहिणाऱ्या नाटककाराने पृथ्वीवरील दीन गायीकडे वळावे ही गोष्ट अभिनंदनीय वाटते. हरिभाऊंची समीक्षादृष्टी फार स्थूल आणि वरवरची आहे. पण त्यांच्यासारख्या समकालीनांना 'सौभद्र-शारदे'त फारसा फरक जाणवत नसे, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे.
 देवल हे मराठीतील श्रेष्ठ नाटककार आहेत काय? त्यांचे नाटक समकालीनांपेक्षा जास्त जिवंत आहे काय? या प्रश्नाला माझे उत्तर 'होय' असे आहे. देवल सामाजिक समस्या चित्रित करणारे वास्तववादी नाटककार आहेत काय? याला माझे स्पष्ट उत्तर 'नाही' असे आहे. सर्वांच्याप्रमाणे मीही कालिदासाला महान नाटककारच मानतो. कालिदासाला कुणीच समस्याप्रधान वास्तववादी नाटके लिहिणारा नाटककार मानत नाहीत. मीही मानत नाही.

 देवलांच्याविषयी मला जे प्रामुख्याने सांगायचे होते ते सांगून संपलेले आहे. पण परिशिष्टवजा अशाही काही बाबी किरकोळ व तपशिलाच्या असल्या तरी येथे नोंदविणे आवश्यक वाटते. देवलांचे संपूर्णपणे स्वतंत्र असे एकच नाटक 'शारदा' आहे. त्यामुळे देवलांच्या नाटकातील संविधानक-रचनाकौशल्याबाबत बोलणे पुष्कळसे धाडसाचे आहे. तरीही पण असे म्हणता येईल की, देवलांच्या नाटकातील संविधानक-रचना गडकऱ्यांच्याइतकी सदोष नसते. या ठिकाणी संविधानक-रचना म्हणताना मला फक्त सुसंगत कथानक अभिप्रेत नाही. तर कथानकाच्या सुसंगतीपेक्षा नाट्याच्या उठावाच्या संदर्भात या कथानकाची मांडणी मला विशेष महत्त्वाची वाटते. कथानकाच्या मांडणीच्या दृष्टीने नेहमी देवल आणि खाडिलकर यांचा उल्लेख केला जातो. 'शारदा' नाटकाचा पुरावा असलाच तर या संविधानक-कौशल्याच्या विरोधी आहे. गडकरी निदान आपल्या नाटकाचा पहिला आणि शेवटचा अंक अतिशय प्रभावी ठेवतात; ही गोष्ट खाडिलकरांना ज्याप्रमाणे जमली नाही, त्याप्रमाणे देवलांनाही 'शारदे'त जम शकली नाही. क्रमाने 'शारदा' नाटक तिसऱ्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशापर्यंत सारखे रंगत जाते. इथून क्रमाने नाटकाची रचना शिथिल होत गेली आहे. चौथ्या अंकापासून तर हे नाटक कोसळतच जाते.अलीकडे

१८ पायवाट