मध्ये एक सूचक अर्थ असतो. या दोन्ही भूमिकांचा खरा अर्थ काय आहे ? प्रतिमा हा केवळ कवितेचा भाग नसून तो भाषेचाच धर्म आहे. शास्त्रांच्या, काव्याच्या बाहेरसुद्धा पर्यायोक्ती असते. कोणत्याही राजकीय नेत्याचे प्रचलित विवाद्य विषयावरील मत पाहा, म्हणजे त्या ठिकाणी पर्यायोक्तीचे आणि सूचनांचे अनेक प्रकार आढळतील. तुम्ही-आम्ही मध्यमवर्गीय माणसे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहोत. आपण नोकरपेशे लोक आहोत. आपणांला सर्वांना हे माहीतच आहे की, वरिष्ठांच्याकडून जेव्हा रिक्वेस्ट येते त्या रिक्वेस्टचा अर्थ 'ऑर्डर' असा असतो. कित्येकदा तर 'प्लीज'चा अर्थसुद्धा आज्ञा असा होतो. भाषेतच नानाविध प्रतिमा सतत घडत असतात. 'वंशवृक्ष' ही अशी प्रतिमा आहे. विचारांची बैठक, तर्काची कु-हाड, मतांचे प्रवाह या साऱ्या आपल्या वादचर्चेतील नित्य परिचित प्रतिमाच आहेत. पुष्कळशा शिव्यांचे स्वरूप तपासले तर त्यांत रूपके आढळतील. सांगण्याचा मुद्दा हा की, प्रतिमांची निर्मिती हा भाषेचाच धर्म असतो. तो भाषेचा धर्म असल्यामुळे कवितेत आणि सांय ललित वाङ्मयात पसरलेला असतो.
कलावादी समीक्षेला आपल्या अस्तित्वाची अलौकिकता, आपल्या रूपाची अलौकिकता किंवा विषयाची अलौकिकता सिद्ध करणे फारसे जमलेले नाही. लौकिक भाषेचे लौकिक गुणधर्म हेच स्वतःच्या अलौकिकतेचे प्रमाण पुरावे समजण्यात कलावादी समीक्षा दीर्घकाळ रमलेली आहे. कलावादी म्हणतात, कलाकृतींना एक स्वयंभू आकार असतो. हा स्वयंभू आकार म्हणजे काय ? व्याख्यान देताना सुरुवात कुठून करायची, लोकांनी उठून जायच्याआधी व्याख्यान कुठे संपवायचे लोकांनी टाळ्या वाजवून गप्प करण्यापूर्वी आपले विवेचन कसे संपवायचे, हे प्रत्येक वक्त्याला ठरवावेच लागते. या व्याख्यानांना एक पूर्णता असते. विचारांच्या व्यूहाला एक स्वतःची पूर्णता असते. समाजरचनांना आणि संस्कृतीलासुद्धा एक स्वतःची स्वयंपूर्णता असते. पूर्णता ही एक कल्पना आहे. तिची जाणीव जीवनातून येते. ज्यांना पूर्णता कशाला म्हणतात याची जीवनात जाणीव होत नाही, त्यांना वाङ्मयात पूर्णता कशाला म्हणतात हे जाणवण्याचा कधी संभव नसतो. माझ्या विवेचनाचा रोख कलाकृतींचे पृथक अस्तित्व, त्यांचे अनन्यसाधारणत्व, त्यांच्या देहरचनेतील प्रतिमांची संघटना, त्यांची पूर्णता या बाबी नाकारण्याकडे नसून त्या स्वीकारण्याकडे आहे. फक्त मला म्हणायचे ते हे की, ह्या सगळ्याच बाबी लौकिक पातळीवर संभवतात, त्यामुळे अलौकिकता सिद्ध होत नाही.
आपणापैकी जे कुणी कलावादी समीक्षेचे अभिमानी असतील त्यांनी जर मध्येच उठून हे सांगितले की, तुम्ही सांगता आहा ते सारे सवंग आहे, उथळ आहे; भडक, नाटकी आणि खोटे आहे, अतिशय स्थूल आणि विपर्यास करणारे आहे, तर मला आश्चर्य वाटणार नाही. ही सगळी विशेषणे आहेत. व्याकरणात ती नक्की कर्त्याच्यामागे जातील असे नाही, पण या शब्दांचे कार्य विशेषणाचे आहे. हे सगळेच शब्द आपण कलाकृतींच्या समीक्षेत वापरतो आहोत. एखादे नाटक भडक आहे, त्यातील चित्रण उथळ आहे असे आपण अनेकदा म्हणतो. हा वाङ्मयातील चित्रणाचा खोटेपणा,