पान:पायवाट (Payvat).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गंगाधर गाडगीळ ही कीड पाहून जाणवणारी विव्हलताच व्यक्त करीत होते. पण ते त्यांना मान्य नव्हते. टिळकांचे चरित्र लिहिणारे गाडगीळ मंगलाची पूजा बांधीत आहेत. पण तेही त्यांना मान्य नाही. जीवनमूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न, मूल्यांविषयीची आस्था, भोवतालच्या परिस्थितीविषयीची चीड, राग यांपासून साहित्य कधी बाजूला जाऊ शकत नाही. जीवनवादी भूमिका कलावंताच्या व्यक्तिमत्त्वातूनच निर्माण होत असल्यामुळे ज्यांना ती मान्य आहे तेही, आणि ज्यांना ती मान्य नाही तेही, या भूमिकेपासून बाजूला जाऊ शकत नाहीत. आम्ही कलावादी आहोत इथून सुरुवात करून हरि नारायण आपटे हे मराठीतील श्रेष्ठ कलावंत होते, त्यांनी त्या काळच्या जीवनाचे अतिशय प्रत्ययकारी व जिवंत असे चित्रण केले आहे, इथे विवेचनाचा शेवट होतो. ही काय कलावादी समीक्षा आहे ?
 हरि नारायण आपट्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उतरार्धातील महाराष्ट्राचे केलेले चित्रण इतके स्वयंभू आणि स्वयंपूर्ण आहे की, ते सगळे जीवनच या कादंबऱ्यांतून आपणासमोर उभे राहते. यापलीकडे जाऊन इतिहास वाचण्याचीसुद्धा गरज राहात नाही, हे म्हणणे खोटे नाही. फक्त हे कलावादी भूमिकेला म्हणता येणार नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की, मराठी समीक्षेतील जीवनवाद कालबाह्य झाला असे समजणा-या कलावादी समीक्षकांच्या विवेचनात सतत जीवनवादी भूमिकाच घेतलेल्या दिसतील. जीवनवादी समीक्षेची खरी अडचण ही आहे की, आपल्यासमोर उभ्या असणाऱ्या मूलभूत प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करावयास ती अजून धजावत नाही, आणि जेव्हा तसा प्रयत्न ती करते, त्यावेळी मूळ प्रश्नच चर्चेतून गळून पडल्याचे दिसून येते.
 'पोत 'सारखा ग्रंथ या दशकातलाच आहे. गोडसे यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की, जीवनाच्या ऱ्हास-काळात जे वाङ्मय निर्माण होते, त्या वाङ्मयामध्ये तो -हास प्रतिबिंबित होतो. गोडसे यांनी हेही दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे की, जेथून जीवनाला नवीन असा आशय मिळायला लागतो, त्या काळात वाङ्मयात एक नवीन सामर्थ्य दिसायला लागते. जीवनाची आणि वाङ्मयाची ही जी सांगड गोडसे यांनी घातली आहे ती स्वीकारार्ह आहे की नाही हा विवाद्य मुद्दा आहे. मला स्वतःला ती कधी स्वीकारार्ह भूमिका वाटली नाही. गोडसे यांनी आपले विवेचन पुराव्याच्या आधारे केले आहे आणि तो पुरावा त्यांनी परिश्रमपूर्वक गोळा केलेला आहे. एका अर्थी ही इतिहास-विवेचनाची पद्धत आहे. ऐतिहासिक पद्धतीनेच त्या भूमिकेशी माझे मतभेद मी इतरत्र सांगितलेत.ले आहे

 आमची सर्वात मोठी अडचण ही आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरि नारायण आपटे निर्माण होत नाहीत, तर ते त्याआधीच निर्माण होतात. एकदा शिवाजी मराठ्यांचे राज्य निर्माण केले की त्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वर-एकनाथ-तुकाराम निर्माण होत नाहीत. तेही त्याआधीच निर्माण होतात. जेथून नव्या प्रेरणा सुरू होतात, ते नवे वाङ्मय सुरू होते की जेथून नवे जीवन सुरू होते, तेथून वाङ्मय सुरू होते- हा एक विवाद्य प्रश्न आहे. परंपरेने चालत आलेले जीवन क्रमाने ऱ्हासाच्याजवळ

गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा १७९