Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. उरलेल्यांना या विषयावर बोलण्याचे कारणच नाही. या प्रस्थापित परंपरांच्याविरुद्ध एक भूमिका साहित्यात निर्माण होते.
 या भूमिकेचे असे म्हणणे असते की, चांगले काय आणि वाईट काय हे ठरविण्याचा आम्हांला अजून अधिकार मिळालेला नाही. जीवनाचा अनुभव घेण्याचा आमचा अधिकार असल्यामुळे समाजाच्या सुप्त आशाआकांक्षा आमच्या लिखाणातून व्यक्त होत असतात. जीवनाचा अनुभव घेण्याचा हक्क जेव्हा आम्ही सांगतो, त्याच वेळी घडणाऱ्या घटनांच्याकडे कोणत्या दृष्टिकोणातून पाहायचे, त्याचे स्वातंत्र्य टिकवण्याचा आमचा अधिकार आम्ही सांगत असतो. मानवी जीवनात चालू असणारा संघर्ष हा व्यापक अर्थाने स्वातंत्र्य सिद्ध करण्याचा संघर्ष असतो. धर्माच्या गुलामगिरीविरुद्ध बंड करताना विचार करण्याचा आमचा हक्क आम्ही प्रस्थापित करतो. माणसाच्या हिताचे काय आणि अहिताचे काय हे ठरविण्याचा, आणि जे हितकारक असेल त्याप्रमाणे वागण्याचा आपला हक्क सांगूनच गुलामगिरीविरुद्धचे बंड निर्माण होते. प्रत्येक समाजाच्या अवस्थेनुसार, समोर आलेल्या प्रश्नानुसार कधी माणसे राजकीय गुलामगिरीविरुद्ध झगडतात, कधी मानसिक गुलामगिरीविरुद्ध झगडतात. कधी त्यांना सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीविरुद्धही झगडावे लागते. या झगड्यांतूनच स्वातंत्र्य ही कल्पना स्पष्ट होत जाते. स्वतंत्र असण्याचा माणसाचा हक्क प्रस्थापित होत जातो.
 व्यक्तिवादाच्या उदयानंतर ललित वाङ्मयातला जीवनवादी भूमिकेचा उदय हा लेखकाच्या स्वातंत्र्याच्या आग्रहातून होतो. ज्यावेळी कलावंत सर्वांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचे आपले स्वातंत्र्य आग्रहाने प्रतिपादू लागतात, त्यावेळी त्यांना जीवनवादी भूमिका घ्यावीच लागते. ललित वाङ्मयातील जीवनवादी भूमिका म्हणजे वाङ्मयाबाहेरच्या कोणत्यातरी भूमिकेचे दास्य नव्हे, तर अनुभव घेणाऱ्या कलावंताने जीवनाचा अनुभव घेताना घटनांच्याकडे · पाहण्याचा आपला दृष्टिकोण अबाधित ठेवण्याचे स्वातंत्र्य होय.

 ललित वाङ्मयात घटनांसाठी घटना या कधी असूच शकत नाहीत. या घटना कलावंतांना कोणत्यातरी दृष्टिकोणाने पाहणेच भाग आहे. घटनांच्या पाठीमागे उभी असणारी मूल्ये आणि संदर्भ जर आपण विसरायला लागलो, तर मग परिस्थितीचे आकलनच आपण करू शकणार नाही. आपल्या बायकोला झोपलेल्या अवस्थेत सोडून पळून जाणारे लोक कमी नाहीत. ते आमच्या मराठवाड्यातही भरपूर आहेत. मधूनमधून दर जिल्ह्यामध्ये ही घटना घडतेच. मुंबईतही पुनःपुन्हा घडणारी ही घटना आहे. पत्नी गाढ झोपल्याची खात्री करून घेऊन तो शुर नवरा कुणालाही कळू न देता दाराची कडी उघडून जो पळतो तो बेपत्ताच होतो. केवळ घटना म्हणून पाहायचे असले तर भगवान बुद्धाच्या गृहत्यागातदेखील यापलीकडे अधिक काहीच नाही. घटना म्हणून पाहिल्यास बुद्धाचा गृहत्याग तुम्ही खऱ्या अर्थाने पाहूच शकत नाही. स्त्रिया पळवून नेण्याचे प्रकार मधूनमधून घडतात. केवळ इतक्याच पातळीवर रामायण पाहता येणे

१७६ पायवाट