पान:पायवाट (Payvat).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनविन्मुक आणि वेजबाबदार आहेत. त्यांना जीवनाचे गांभीर्य समजत नाही. त्यांना स्वातंत्र्याविषयी आस्था नाही. त्यांना गुलामगिरीची चीड नाही. उलट ते स्वतःच्या आणि समाजाच्या परंपरागत गुलामगिरीत स्वेच्छया सहभागी होणारे लोक आहेत. दोन लोकशाहीवादी पक्षांनी परस्परांच्यावर तुम्ही हुकूमशाहीवादी आहात असा आरोप करावा, त्यातलाच हा प्रकार आहे. दोन्ही भूमिका कलावंताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ती स्वातंत्र्य या कल्पनेची परस्परपूरक अशी अंगे आहेत.
 समाजात जे परंपरेने मान्य आहे, कायद्याने, धर्माने आणि इतर सर्व अधिकारक्षेत्राने ज्याला मान्यता दिली आहे, त्याचे अनुसरणच कलावंतांनी केले पाहिजे असे बंधन जर एकदा कलावंतावर टाकले, तर त्यानंतर कलावादी आणि जीवनवादी भूमिका यांच्यात वादच शिल्लक राहात नाही. मानवी संस्कृतीतील सर्व प्राचीन वाङ्मयात ही गोष्ट आपणाला सातत्याने दिसून येईल. कलावादाच्या, आनंदवादाच्या आणि अलौकिकतेच्या भूमिका घेणाऱ्या लेखकांनी मनात थोडासाही किंतू उत्पन्न न होता जीवनवादाच्या, बोधवादाच्या आणि उपदेशाच्या भूमिका स्वीकारल्या आहेत. भरतमुनींनी नाट्य हे विश्रांतिकारक आहे, सुखकारक आहे, ती क्रीडा आहे असेही म्हटले आहे आणि हे नाट्य सर्वप्रकारचा बोध आणि शिक्षण देणारे आहे असेही म्हटले आहे. मम्मटासारखा माणूस मांगल्याचे रक्षण, व्यवहारज्ञान आणि उपदेश याही बाबी सांगतो. काव्यानंद अलौकिक आहे, अलौकिक रस आणि त्याचा आस्वाद हे काव्याचे फळ आहे असेही तो सांगतो. प्राचीन संस्कृतीत कुणालाच कलावाद आणि जीवनवाद यांत विसंवाद जाणवला नाही.
 हा विसंवाद त्या काळात जाणवण्याचा संभवच नव्हता. त्या प्राचीन काळाला व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य मान्यच नव्हते. चांगले काय आणि वाईट काय याचे निरपवाद आणि अंतिम निर्णय धर्माने स्वीकारलेले असत, ते सर्वांनाच मान्य होते. त्याच्याशी अविरोधी राहूनच सर्व कलात्मक व्यवहार चालत असल्यामुळे परंपरेच्या प्रवाहातच सारे कलावंत अनुभव घेत होते, विचार करीत होते. हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लौकिक कल्याण आणि अलौकिक कल्याण अविरोधी असतात. दोन्ही पातळीवरचे आनंद अविरोधी असतात. कला विरुद्ध जीवन हा संघर्ष व्यक्तिवादाच्या उदयापूर्वी सुरू होत नाही. आणि व्यक्तिवादाचा उदय ही मानवी संस्कृतीने, परंपरा व धर्म यांनी प्रस्थापित केलेल्या गुलामगिरीविरुद्धच्या बंडाची पहिली भूमिका होती.

 परंपरेला मान्य असणारी समाजव्यवस्था आणि मूल्ये यांच्यापेक्षा नव्या आणि वेगळ्या मूल्यांचा आग्रह धरणारे वाङ्मय निर्माण होते, त्या वेळी प्रस्थापिताशी एक संघर्ष सुरू होतो. नव्या मूल्यांचा आग्रह सुरू झाल्याबरोबर प्रस्थापित परंपरांचे रखवालदार सांगू लागतात की, तुम्ही कलावंत आनंदाच्या गोष्टी बोला, तुम्ही काव्याच्या जगात रमा, कल्पनाविलास आणि रस हे तुमचे क्षेत्र आहे; जीवनात चांगले काय आणि वाईट काय हे तुम्ही सांगू नका. जीवनाचे मार्गदर्शन करण्याचा हक्क धर्माचा आणि राजसत्तेचा

गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा १७५