उत्कटतेने आणि तन्मयतेने सुर्वे घेतात, त्या अनुभवांच्या पोटात भावनांचे कितीतरी सूक्ष्म पदर गुरफटलेले असतात. या अनुभवाच्या पोटात खोलवर शिरून त्याचे सगळे पदर उकलून पाहणे, निदान शक्य ते पदर उकलून पाहणे, अजून या कवितेला जमत नाही. म्हणून ही कविता घडणाऱ्या भयाण घटनांची नोंद घेत राहते, पण त्यांची एकूण मानवी जीवनात संगत लावू शकत नाही. वेश्याव्यवसाय जरी घेतला तरी त्याला अनेक पदर असतात. चंद्रा नायकिणीलाही पुत्रवात्सल्य असते, हे खरेच आहे. पण त्याखेरीज चंद्रा नायकिणीला स्वतःचा धंदा असतो. समाजामध्ये फक्त सामाजिक विकृतीच असते असे नाही, मानसिक विकृतीसुद्धा असते. या जीवनाच्या लढाईत हजार घाव ताठ मानेने सहन केले पाहिजेत, हे एक सत्य झाले. पण या घावांच्यामागे असणाऱ्या कारणांची विविधता, हे एक दुसरे सत्य असते. कुठेतरी माणसाला आपल्या लौकिक जीवनाच्या संदर्भातून मोकळे होणे जमावे लागते, अलौकिकाच्या पसाऱ्यात काही शोध घ्यावा लागतो. या सगळ्याच बाबी अजून सुळेंना जमायच्या आहेत. त्यामुळे या कवितेला बहुपिंडी समृद्धता अजून प्राप्त व्हायची आहे. या कवितेत कवीचे सूर तारषड्जापर्यंत स्वच्छ लागलेले आहेत, पण खर्जाशी त्याचा सतत संवाद साधला जायला पाहिजे. ते अजून सुळेंना जमत नाही.
सुर्व्यांना काय जमत नाही किंवा या कवितेला अजून काय जमलेले नाही, ही यादी करण्यात अर्थ नाही. कारण या यादीचा शेवटचा निष्कर्ष व्यास-वाल्मीकी होणे सुळेंना जमणे नाही इतकाच येईल. व्यास-वाल्मीकी आपण आहोत हा सुर्व्यांच्या कवितेचाही दावा असू शकत नाही. त्यांच्या कवितेच्या मोठ्यांतमोठ्या चाहत्यालासुद्धा हे माहीत असते. पण सुळेंना मराठीत काय जमले नाही, यावर या कवितेचे वाङ्मयीन मूल्यमापन करता येणार नाही. प्रचाराच्या चौकटीत अडकल्यामुळे सुर्व्यांच्या किती टक्के कविता कविता होण्याची क्षमता असून जायबंदी होतात, हा हिशेब जरूर करावा. पण ही टक्केवारी मांडल्यामुळे या कवीने अस्सल कवितेचे जे सृजन केले आहे, तिचे मोल ठरविता येत नाही. मराठी नवकविता मर्ढेकरांपासून नवनवे प्रयोग करीत आहे. ती कुठे विचार भावनेच्या पातळीवर नेत आहे, कुठे नव्या दैवतकथा घडवीत आहे. जीवनाचा अर्थ शोधण्याची तिची धडपड अखंड चालू आहे. आशयाच्या मांडणीपासून, रचनेच्या पद्धतीपासून अनुभव घेण्याच्या पद्धतीपर्यंत नवनव्या शक्यता ती हुडकून काढीत आहे. या कवितेचा एक धागा सामाजिक जाणिवांना कलेच्या पातळीवर नेत आहे, दुसरा धागा विशुद्ध भावकवितंचा आहे. कवी हा समाजप्रवाहाचा भाग असल्यामुळे आत्मनिष्ठाच जिथे सामाजिक जाणिवेचे रूप घेऊन साकार झाली आहे, तो टप्या सुर्व्यांच्या कवितेचा आहे. म्हणून सुर्व्यांची कविता ही खऱ्या अर्थाने बहिणाबाईने मराठी कवितेवर केलेले संस्कार पचवून मराठी कवितेचा सांधा पुन्हा एकदा नव्या पातळीवर नव्या पद्धतीने तुकारामाशी जोडण्याचा प्रयत्न करणारी कविता आहे.
आता जे अंतर सुर्वे आणि तुकाराम यांच्यात शिल्लक राहते, ते दोघांच्या मनाच्या