टाकायचे असते. पण ती मध्येच बोलायची थांबते. कारण मोकळेपणाने बोलणे हा तिचा स्वभावच नाही. उरावर दगड ठेवून ती बोलत असते. तारा जरी पिळल्या, सारी सतार झंकाराच्या अवस्थेत असली, तरी तिच्या छातीवर जबाबदारीचा दगड असतो म्हणून संसाराच्या या रथयात्रेत काहीही न बोलता फक्त ओझे उचलण्याची जबाबदारी तिची असते.
ही प्रेयसी या दगडी कवीला हळवी करते. तिची चिंता ही याची चिरवेदना आहे. ज्यावेळी अस्तित्वाच्या पोकळीत आपण असणार नाही, तेव्हा आपल्या आठवणी काढून तिने रडत बसू नये, निःशंक मनाने डोळे पुसून आपले हुदंके आवरावेत, निष्कारण चिरवेदनेच्या नादी लागू नये, नवे घर मांडावे, आपली आठवण विसरणेच अशक्य असेल तर आपली इच्छा म्हणून नवा संसार उभा करावा. पण शक्य असेल तर आपल्याला विसरून तिने पुन्हा हिरवा चुडा भरावा असा कवीचा सल्ला आहे. चिरवेदनेच्या नादी तिने लागू नये हे सांगणे उदारपणाचे लक्षण नाही. पण जो स्वतः पानाच्या सळसळीतून तिची आठवण काढतो, ज्याला ढगांचा गडगडाट तिच्या आठवणी देतो; ज्याला आपले सगळे अस्तित्व तिचा पदर शीड झाल्यामुळे रस्त्यावर आहे, एरव्ही वादळ सुटल्यावर गलबत भरकटले असते असे वाटते; आपली सगळी कविता तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात जो लिहितो, त्याने आपल्या प्रियेला तू चिरवेदनेच्या नादी लागू नकोस असा सल्ला द्यावा, हा खुळेपणा नाही काय ? पण हा खुळेपणा मनाच्या हळवेपणातून आलेला आहे. जीवनात हाच एक आधार आहे. इथे आला की कवी हळवा होतो. बाकी सगळ्या दुःखांकडे तटस्थ प्रामाणिक साक्षीदार म्हणून पाहणारा कवी येथे मात्र अलिप्त राहू शकत नाही.
सुर्व्यांच्या कवितेचे वेगळेपण असेल तर ते हे आहे. समाजाच्या नव्या कणखर आणि दणकट जाणिवा घेऊन ही कविता आकार घेत आहे. जिथे जगण्याची लढाई चालू आहे, त्या लढाईचा हा कवी सहभागी आहे आणि साक्षीदारही आहे. ही लढाई संपवून संस्कृतीचे प्रश्न अजून निर्माण झालेले नाहीत. उलट सुर्व्यांनी हे टिकवून राहण्याचे संगरच सर्व व्यथांनिशी सांस्कृतिक पातळीवर साकार केले आहे. म्हणून ही कविता व्यथांनी शेकून अधिक टणक झालेल्या मनाची कविता आहे. पण या व्यथेच्या अग्नीत होरपळत असतानाच ही कविता अधिक जिवंत आणि उत्कट झालेली आहे. आजतागायत जे आकलन बाहेरून आणि बौद्धिक होते, ते आकलन येथे स्वतःच्या जीवनाचा भाग म्हणून अंतरंगातून साकार होत आहे. हे दुःख पाहताना रडून उपयोगी नाही. जोपर्यंत जगात टिऱ्या आणि अर्धपोट आहेत, तोपर्यंत आम्ही नंगे आहोत. हा नंगे नसणाऱ्यांच्या व्यापक जाणिवेचा भाग आहे. सुर्व्यांची कविता ही प्रत्यक्ष नंग्यांनीच गायिलेली कविता आहे. हे दुःख पाहणे शक्य नाही म्हणून करंदीकरांनी आपल्या मनाला दगड होण्याचा आणि डोळे शिवण्याचा उपदेश केला आहे. पण ज्यांना हे दुःख केवळ पाहावयाचे आहे, त्यांना डोळे शिवता येतात; ज्यांना हे दुःख देवाप्रमाणे भोगून संपवावयाचे आहे, त्यांच्या