पान:पायवाट (Payvat).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येऊन आत्महत्या करणारेही आत्महत्येच्या त्या क्षणापर्यंत जगतच असतात. मरण येईपर्यंत जगणे हे भागच असते. त्यामुळे जिवंत असण्याचा आशे-निराशेशी संबंध नसतो. या जगण्याचे मूल्य काय ? या जगण्याला अर्थ काय ? त्याचे महत्त्व काय ? याची उत्तरे सापडत नसली, ही उत्तरे कधीच कुणाला सापडू शकत नाहीत असे वाटत असले, म्हणजे जीवन व्यर्थ वाटू लागते. जीवन सार्थ अगर व्यर्थ वाटणे, हा वाटण्याचा भाग आहे, असण्याचा भाग नाही. कारण असणे निसर्गक्रमात प्रतिसृष्टीपासून माणसापर्यंत वारसाहक्काने चालत आले आहे. यातील आश्चर्यकारक घटना ही आहे की जे जगण्यासाठी झुंजत असतात, त्यांना जीवन व्यर्थ वाटण्याचा संभव फार कमी असतो. जिवंत राहण्यासाठी जो झगडा त्यांना द्यावा लागतो, ती झुंजच त्यांना जिवंत असण्याचे महत्त्व पटवून देते. ज्यांना अशी झुंज द्यावी लागत नाही, त्यांच्याबाबतीतच हे जीवन सार्थ की व्यर्थ असे प्रश्न संभवतात.
 मानवी जीवनच या पद्धतीचे आहे. जनावरांना आशाही नसते, निराशाही नसते. कारण त्यांना संस्कृती नसते. आशानिराशेला संस्कृतीत जागा असते, म्हणून एखाद्या मूल्यासाठी हसत प्राण देणे संस्कृतीला शक्य असते. आणि कोणतेच मूल्य सापडत नाही म्हणून प्राण देणेही फक्त संस्कृतीलाच शक्य असते. माणूस जन्माला येतो, जगतो आणि मरतो, हा व्यवहार जनावरांपेक्षा निदान अजून तरी फारसा निराळा नाही. या निसर्गक्रमाखेरीज जे माणूस निर्माण करतो, त्याला मूल्य असते. इथून आशानिराशेचा प्रांत सुरू होतो. यांपैकी निराशाच गंभीर असते आणि आशा मात्र उथळ असते, असे समजण्याचे काही कारण नाही. निराशा अनेकपदरी असते, तिला अनेक संदर्भ असतात, आणि आशा मात्र फक्त साचेबंद, एकपदरी असते, तिला नाना संदर्भ नसतात, हा पाहण्याच्या दृष्टीतला दोष आहे. पण मराठी वाङ्मयाचा प्रांत निराशेने असा काही व्यापलेला आहे की आशा नावाचेही काही प्रकरण मानवी जीवनात असते, हेच गंभीर चेहरा करून सांगण्याची आता पाळी आली आहे.

 वाङ्मयाचा एक टप्या सामाजिक जाणिवेचा पाठलाग करताना वाङ्मयाला उथळ प्रचाराच्या पातळीवर खेचणारा निघाला की नंतर त्याची प्रतिक्रिया सुरू होते. ही प्रतिक्रिया इतक्या टोकाला जाते की सामाजिक जाणिवांनाच कवितेतून हद्दपार करण्याची शर्यत सुरू होते. सामाजिक जाणिवांची जणू लेखक-समीक्षकांनी धास्तीच घेतलेली आहे. उपासमारीने माणसे मरतात, या ठिकाणी येऊनच लेखकाने थांबले पाहिजे. उपासमारीने माणसे चिडून बंड करून उठतात, हे सांगणे हाच वाङ्मयीन गुन्हा होऊ लागलेला आहे. सुर्व्यानी माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही असे म्हटले की भल्याभल्यांना त्यात पोथीनिष्ठा आढळू लागली आहे. शेवटी सृजन हा माणसाचा धर्म आहे. ही भूमी काही एका पक्षाच्या मालकीची व्हावी काय ? माणूसच माणसाला जगण्यासाठी अन्न निर्माण करतो, माणूसच माणसाला मारण्यासाठी हत्यारही निर्माण करतो, तोच गुलामगिरी निर्माण करतो, तोच गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठतो. ही निर्मिती हे माणसाचे माणूसपण आहे. या

नारायण सुर्वे यांची कविता ११५