पान:पायवाट (Payvat).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या निष्टाना तडा जात नाही. हा इमानी आत्मा बहिऱ्या प्रेतांच्या कानांशी बसून आहे. त्यामुळे काही ऐकले जाण्याची शक्यताच नाही. ज्याला आपण नव्या माणसाचा नवा जन्म म्हणतो, तो नव्या माणसाचा जन्म नाही, तर तो नव्या प्रेताचाच मृत जीवन जगण्यासाठी, पुन्हा मरण्यासाठी जन्म आहे. रेताच्या प्रत्येक थेंबात एका नव्या प्रेताचा जन्म असतो. हा सगळा निराशावाद आहे. नव्या मराठी लेखकांचा या नैराश्यावर, निदान कवितेच्या जगात, प्रामाणिक विश्वास आहे.
 निराशेवर प्रामाणिक विश्वास असणाऱ्यांना आशावाद उथळ व खोटा वाटावा, यात आश्चर्य काहीच नाही. पण आशावादावर तेवढाच भर असणाऱ्यांना हा निखालस निराशावाद तितकाच खोटा वाटला तर त्याबद्दल कोणी तक्रार करण्याचे कारण नाही. खरोखरच हे मानवी जीवन निरर्थक आणि व्यर्थ आहे का ? याचे उत्तर कवितेने द्यायचे नाही. कारण ते काव्याचे काम नव्हे. त्याचप्रमाणे जीवनात आशेला जागा आहे की नाही याचेही उत्तर कविता देणार नाही. ज्यांना निराशाच खरी वाटते त्यांचे, ज्यांना आशाच खरी वाटते त्यांचे, ज्यांना दोन्हीही अधूनमधून खऱ्या वाटतात, आणि ज्यांना दोन्हीही कायम खोट्या वाटतात, त्या सर्वांचे अनुभव शब्दाच्या माध्यमाद्वारे एकात्म, उत्कट पातळीवर कविता फक्त अभिव्यक्त करीत असते. ही पातळी गाठली जाते की नाही, हा खरा प्रश्न असतो. कवी आशावादी आहे की नाही हा खोटा प्रश्न असतो.
 अडचण ही आहे की आशावादी माणसाला जीवनाचे आव्हान पुरेशा गांभीर्याने जाणवत असते, हेच आपण मनाशी कबूल करावयास तयार नाही. प्रसूतिवेदनांनी तडफडत असणाऱ्या स्त्रीला वेदना खोट्या वाटत नसतात. या वेदनांमुळे सर्व अंगाला घाम फुटलेला असतो. सगळा कंट कण्हण्याखेरीज दुसरा आवाज करीत नसतो. व्यथेची ही तीव्रता आणि सत्यता मान्य करणारे आणि भोगणारे आशावादीही असू शकतात. पुष्कळदा तर असे आढळते की ज्यांनी या व्यथा भोगलेल्या असतात, जे या व्यथा भोगीत असतात, तेच आशावादी असतात. ज्यांची दुःखे भोगण्याची हिम्मत नसते, ते निराशावादी असतात. माझा कवितेतील निराशावादावर कोणताही आक्षेप नाही. कारण तोही एक जीवनाचा भाग आहे. पण ज्यावेळी आशावाद असणे हाच गुन्हा ठरू लागतो, त्यावेळी निराशावादाची एकदा तपासणी करावी लागते.

 ज्यांना जीवन व्यर्थ वाटते, त्यांना खरोखरी व्यर्थ काय वाटते, हेही समजून घतले पाहिजे. कारण जन्म या सर्व वाटण्याच्या पूर्वीच मिळालेला असतो. तो मिळणे अगर न मिळणे या वाटण्यावर अवलंबून नसते. याच्याउलट वाटणे न वाटणे हे मात्र जन्म मिळण्यावर अवलंबून असते. ज्याला जन्मच मिळाला नाही, किंवा जो जीवन संपवून मरणाचा उंबरठा ओलांडून पलीकडे गेला आहे, त्याला काही वाटण्या-न-वाटण्याचा प्रश्नच नसतो. हे जे अपरिहार्यपणे प्राप्त झालेले अस्तित्व, ते कुठल्याही विचाराच्या पूर्वीचे आणि विचारप्रक्रियेलाही पूर्वीचे असे असते. जीवन सार्थ आहे म्हणणारेही जगत असतात, जीवन व्यर्थ म्हणणारेही जगत असतात. जगण्याचा कंटाळा

११४ पायवाट