पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक पानपताच्या धक्याने मराठी साम्राज्याची इमारत मुळापासून इतकी हादरली होती की, त्या वेळी हिंदुस्थानांत असलेल्या मराठेतर राज्यकर्त्यांना असे वाटले होते की, आतां ही इमारत वर्ष दोन वर्षांत ढासळून जमीनदोस्त होईल. पण हा त्यांचा अंदाज चुकीचा ठरून आणखी पन्नास वर्षे तिचे आयुष्य वाढविण्यास त्या वेळी जर कोणाचे विशेष गुण कारणीभूत झाले असतील, तर ते श्रीमंत थोरल्या रावसाहेबांचे च होत. पण अजून ही गोष्ट स्वानुभवाने हैदरच्या प्रत्ययास यावयाची होती. हैदर तुंगभद्रा उतरल्याचे वर्तमान ऐकून श्रीमंतांनी मिरजेस व अथणीस पटवर्धन, रास्ते वगैरे सरदारांना एकदम फौजा जमा करण्याचे हुकूम सोडून आपण खुद्द पुण्यास हि सैन्य जमविण्याची जारीने तयारी चालविली. गोपाळराव पटवर्धन व आनंदराव रास्ते आधीच पुढे निघाले आणि सावनूरजवळ तीस कोसांच्या अंतराने मराठे व हैदर यांचे तळ पडले. तेव्हां हैदरने धाकदपटशा देऊन सावनूरकर नबावापासून गुपचुपपणे चाळीस हजार होन खंडणी घेऊन तुंगभद्रा ओलांडली. श्रीमंत पेशव्यांची स्वारी शके १६९१ च्या दसच्यानंतर पुण्याहून निघाली. स्वारींत पटवर्धन, धायगुडे, रास्ते, सावनूरकर, कडपे व कर्नूळकर नबाब, कित्तुरकर, अक्कलकोटकर, नागपूरकर, नरगुंदकर, गायकवाड, मुरारराव घोरपडे वगैरे सरदार व हुजरांत पागा, पथके आणि तोफखाना मिळून एकंदर सुमारे पाऊण लक्ष फौज गुंतली होती. तोफखान्यांत ५० तोफा असून मल्हारराव, कृष्णराव माधव, भिवराव यशवंत व जयवंतराव यशवंत हे पानसे सरदार बरोबर होते. हैदरची फौज पाऊण लाखाच्यावर होती व त्याचा तोफखाना उत्तम होता. श्रीमंतांनी मसलत ठरवून आपण स्वतः श्रीरंगपट्टणच्या रोखें निघाले व गोपाळराव पटवर्धनांस हैदरच्या तोंडावर ठेवून त्याचा पिच्छा पुरविण्याची त्यांस आज्ञा केली. श्रीमंतांबरोबर मल्हारराव, भिवराव व कृष्णराव (आनंदराव) हे पानसे सरदार होते. वाटेत जातां जातां श्रीमंतांनी बुद्धेहाळ, हागलवाडी, चिकनायकनहळी, कंदिकिरे, नागमंगळ वगैरे ठाण्यांवर तोफांचा मारा करून ती काबीज केली. चिकनायकनहळीपासून एक लक्ष पस्तीस हजार रुपये खंडणी श्रीमंतांनी घेतली. कंदिकिरे येथील ठाणेदाराने थोडा नेट धरल्याने मराठ्यांनी आपल्या तोफा चालवून तट पाडून ठाणे काबीज केले. नागमंडळ ठाणे साधारण मोठे होते पण तें तोफांचे मारे लावून जमीनदोस्त केले आणि त्यापुढील वेलूर ठाणे घेऊन तेथे फौज व दारूगोळा भरपूर जमा करून ठेवला. हैदर हा पेशव्यांच्या भयाने, मसूरच्या झाडींत जो एकदां दडी मारून बसला तो वरे च दिवस बाहेर च पडला नाही. श्रीमंतांची त्याला या वेळीं जबरदस्त दहशत पडली. श्रीमंत थेट दक्षिणेस चिकबाळापूरपर्यंत गेल्याने हैदरने झाडी सोडून चळवळ सुरू केली. त्याचा सरदार मीर रेझा हा देवदुर्गाकडे चालला असता, त्याचेवर मल्हारराव उर्फ मलबा पानसे यांनी आठ हजार स्वारांनिशीं हल्ला केला, पण रेझा हा मल्हाररावांच्या हातून निसटला. या हैदरावरील तिस-या