पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे६. हमी ? कसली हमी ?
 हे पटत नाही मि. गायकवाइ -धिस इज सिंपली रबिश. आय मस्ट से....' संतापानं लाल होत कलेक्टर भावे म्हणाले, तसा त्यांच्यासमोर उभा असलेला गायकवाड मनोमन शहारला....
 "मी तुम्हाला मागच्या महिन्यात सर्व्हेसाठी पाच जीप अधिग्रहित करून दिल्या. कडा विभागाचे व इतर जिल्ह्यांचे सर्व्हेअर दिले. अपेक्षा हीच होती की, तुम्ही एका महिन्यात मला प्रत्येक तालुक्यातील किमान दहा नालाबंडिंगच्या कामाचे सर्व्हे इस्टिमेट करून मंजुरीसाठी सादर करावेत.... आज तुम्ही सांगता की, ऐंशी एस्टिमेटऐवजी फक्त बाराच तयार आहेत म्हणून... धिस इन बियौंड इमेजिनेशन-" भाव्यांचा राग प्रामाणिक व रास्त होता.

 मी त्यांच्या बाजूलाच बसलेलो होतो. मलाही गायकवाडांच्या मख्खपणाचा राग येत होता आणि त्याला काही इलाज नाही हेही पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत होतं.

 काही माणसं वयोमानाप्रमाणे उच्चपदाला पोचतात, पण त्यांचा वकूब त्याप्रमाणे नसतो... है गायकवाडच्या बाबतीत मी जाणून होतो, पण भावेसाहेबांना ते माहीत नव्हतं.


हमी ? कसली हमी ?/७५