पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याच्या उलट आहे सुनंदाचं आजवरचं व्यतीत झालेलं जीवन, समृद्ध कराडला तिचं आयुष्य गेलं. नदीकाठच्या देवळाचे तिचे वडील पुराणिक, खाऊनपिऊन सुखी. खरं तर तिथंच कुठेतरी तिला उजवायची, पण लग्नगाठी स्वर्गात पडतात, असं जे म्हटलं जातं ते खोटं नाही म्हणायचं. त्याखेरीज का ती आपल्याला सांगून आली? दोघांचा कडक मंगळ ही एकच बाब हे लग्न जुळायला कारणीभूत ठरली.

 कशी जुळवून घेईल ही आकाशवाडीत? तिला माहीत आहे का बाजेवरची आंघोळ? बाजेवर बसून स्नान करायचं व स्नानाचं पाणी टोपलीत साठवायचं, ते मग वापरण्यासाठी उपयोगात आणायचं !

 ...सदाला आपल्या विचारांचा भार पेलेना. तो खाली आला व आपल्या भावाकडे गेला आणि गप्पांत स्वतःला रमवू लागला.

 पावणेपाचला त्यांची बैलगाडी आकाशवाडीकडे चालू लागली.

 ‘दादा, आजचा दिवस शुभ खरा. कारण आज मृगाचा पहिला दिवस!' शंकर म्हणाला.

 'खरंच की, आज सात जून! मृगनक्षत्राचा पहिला दिवस. पावसाचा दिवस पण छे - या भागात गेल्या कित्येक वर्षात या दिवशी पाऊस झाला नाही. तो येतो जूनअखेर किंवा जुलैमध्ये...

 ‘पण पाऊस थोडाच पडणार आहे शंकर...!' किंचित खिन्न हसत सदा म्हणाला.

 ‘पडेलही. आमच्या वहिनीचा पायगुण म्हणून...' शंकर आपला अधोमुख वहिनीकडे पाहात म्हणाल्या.' आपल्या आकाशवाडीत आपल्या पिढीत भरपूर पाण्याच्या भागातून आलेली एकच सून आहे, ती म्हणजे आमची वहिनी.. देव करो व तिच्या पायगुणानं पाऊस पड़ो!'

 सदा मांडवपरतणीसाठी कराडात गेल्यावर गावात बेडकाची यात्रा काढली होती. त्या दिवशी टँकर आला होता त्या पाण्यानं सचैल स्नान करून पांच सुवासिनीसह बेडकाची यात्रा काढून देवीच्या मंदिरात पावसासाठी प्रार्थना केली होती. दरवर्षीचा आकाशवाडीचा तो रिवाज होता. कारण पावसावरच त्यांचं सारं काही अवलंबून होते.


पाणी! पाणी!! / ६८