पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ‘इथं सरबत मिळत नाही.' एवढंच त्यानं रुक्षपणे उत्तर दिलं. मग तिला नाइलाजानं तो कढत चहा घशाखाली उतरवावा लागला. तो गुळाचा चहा होता, ती तो प्रथमच पीत होती. त्याची चव तिला कशीशीच लागली!

 ‘ते आपलं गांव बघ सुनंदा. बैलगाडीचा ऊन लागू नये म्हणून लावलेला पडदा सारीत सदानं तिला हातानं डोंगरमाथ्याकडे दाखवलं.

 त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात तो डोंगर ताठ उभा होता. त्याच्या माथ्यावर पठार होतं. त्या पठारात आकाशवाडी वसली होती.

 हे सारं तिला नवलाचं वाटत होतं. त्याचबरोबर मनात एक अनाम ताणही होता. त्याचं नेमकं स्वरूप तिला कळत नव्हतं. त्याला विचारावं, तर धाडस होत नव्हतं. कारण बैलगाडीत दीर होता, गाडीवान होता.

 ‘शंकर, सासरेबुवांनी पाच वाजून पाच मिनिटांनी गावात जोडीनं प्रवेश करावं असं सांगितलं आहे. सदा आपल्या भावाला म्हणाला.' ते ज्योतिष जाणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की, आजची सात जूनची ही वेळ शुभशकुनाची आहे. तेव्हा इथंच थोडा वेळ आपण थांबू.'

 तिचा दीर व गाडीवान बैलगाडी थांबवून खाली उतरले व एका बाभळीच्या किचित छाया देणाच्या झाडाखाली खांद्यावरचा गमचा टाकून गप्पा मारीत बसले.

 गाडीत ते दोघेच होते. निःशब्द. ती मान खाली घालून गुडघे मोडून बसलेली, तर तो पाय लटकावीत बसलेला... आपल्या गावाकडे दुरून पाहात बसलेला.

 ‘हा आपला स्वभाव नाही आपण आजच असे पुन्हा पुन्हा व्याकूळ का होत आहोत?-' तो विचार करीत होता. आपलं आकाशवाडी म्हणजे माणप्रांतातल्या इतर कुठलाही गावापेक्षा आकाशाला जवळचं. कारण ते उंच डोंगरावरील पठारात वसलेलं; पण इतर गावांशी फटकून वागणारं - अलग राहाणारं. लग्नाला आलेल्या मुंबईच्या कापड गिरणीत काम करणा-या आपल्या मावसभावानं काय बरं शब्द वापरला? हा डिटॅच... सर्वांपासून तुटलेला. आपल्या या गावची, साऱ्यांची वृत्ती अशीच आहे डिटॅच, त्याला आपणही अपवाद नाही. भावनेची गुंतवणूक परवडत नाही; कारण दुष्काळ व दुर्भिक्षाला तोंड देता देता जगणं हेच मुळी कठीण आहे. मग अशा भरल्या देहाला शोभणाऱ्या मन-मानसाच्या गोष्टी कशा परवडणार?


खडकात पाणी / ६७