पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाठवून रोजगार हमीचे नायब तहसीलदार भालेरावांना तातडीने येण्यास सूचित केले व एक शिपाई पाठवून शेतकरी - शेतमजूर पंचायतीचे तालुका चिटणीस विसपुतेंना बोलावून आणण्यास सांगितले.

 कार्यालयात नेहमी नवाच्या आत येणारा एम. ए. जी. विभागाचा क्लर्क वाघमोडे सोडता शिंदे एकटेच होते व विचार करीत होते...

 गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या गावातून कामाची मागणी आली होती, तेथे तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील मजुरांना त्या गटातच शक्यतो रोजगार हमीचे काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्या ज्या मजुरांनी त्यांना काम मागितले होते, त्यांना लेखी पत्र देऊन सोईच्या कामावर पाठवले होते.

 तरीही कोळगाव दिघीची एक महिला काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती.

 विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवतं नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर काम चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती !

 शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी या बिहार मधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या - पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भूकेची तीव्रता टी. व्ही. द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, ‘कान्त एवढं काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात, मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघड़ी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं.!"

 तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा 'द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. खरंच रेणू मला कळतं की हा पळपुटेपणा आहे, मी नाही पाहू शकत. सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची -- आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते....'

पाणी पाणी!! / ४८