पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्यांच्या तालुक्यात 'शेतकरी शेतमजूर पंचायत’ प्रभावी होती, त्यांच्या मार्फत लेखी फॉर्म भरून कामाची मागणी व्हायची. अशावेळी कायद्याप्रमाणे त्यांना त्वरित रोजगार हमीचे काम देणे भाग पडायचे. अन्यथा बेकार भत्ता देणे बंधनकारक होते व ते 'मागेल त्याला काम ' देणा-या राज्यशासनासाठी नामुष्कीची बाब होती. त्यामुळे शिंद्यांना फार दक्ष राहावं लागत होतं, पण रोजगार हमीचं प्रत्यक्ष काम करणारी मृदसंधारण, बांधकाम वा सिंचन विभागाची यंत्रणा मात्र तेवढी जागृत नव्हती, त्यांना दुष्काळाचे म्हणावे तेवढे भान नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य शिंद्यांना मिळत नव्हतं. समन्वयक म्हणून त्यांना प्रसंगी स्वतःची तहसीलदारकी विसरून थेट कनिष्ठ अभियंता वा मस्टर असिस्टंटपर्यंत संपर्क साधावा लागत होता.

 शिंदे तरुण होते, उत्साही होते व यावर्षीचा पडलेला दुष्काळ हे एक आव्हान समजून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते, हे कलेक्टर जाणून होते व प्रसंगी मिटिंगमध्ये इतर तालुक्यांच्या तहसीलदारांना सांगत, 'शिंद्याप्रमाणे तुम्हीही सामाजिक बांधिलकीची भावना मनात रुजवा. थोडा रेहेन्यू खाक्या विसरून काम करा...'

 आणि या पार्श्वभूमीवर कलेक्टर जे फोनवर सांगत होते, त्यामुळे शिंदे अक्षरशः सुन्न झाले होते!

 त्यांच्या तालुक्यातील काळगाव दिघी या गावची एक मध्यमवयीन स्त्री रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. सध्या राज्य विधि मंडळाचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होते व तालुक्याचे आमदार विरोधी पक्षाचे व रोजगार हमी योजनेच्या विधि मंडळ समितीचे सदस्य होते. त्यामुळे असेंब्लीमध्ये प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना मांडली जाण्याची शक्यता होती.

 कलेक्टरांची काळजी व रागही रास्त होता. वृत्तपत्रात बातमी येईपर्यंत शिंद्यांना माहिती नव्हती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कलेक्टरांना तोंड देणे अवघड होऊन बसले होते.

 'सर, या क्षणी मी काही सांगू शकत नाही पण मी एक दीड तासात सर्व माहिती घेऊन फोन करतो आय अॅम एक्स्ट्रिमली सॉरी सर पण - पण...'

 'ओके - इटस् ऑल राईट : चंद्रकांत पण हे मॅटर तुला, मला जड़ जाणार आहे. मी आज रामपूरला आहे तिथं मला फोन करून कळव. किंवा फोन नाही लागला तर, चारनंतर सरळ माझ्याकडे हेडक्वार्टरला ये...'

 अक्षरश : दहा मिनिटाच्या आत रेणुकेच्या आग्रहाला न जुमानता शिंद्यांनी ब्रेकफास्टही न घेता कार्यालयात येऊन माहिती मिळवायला प्रारंभ केला. त्यांनी जीप


भूकबळी / ४७