पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असल्यामुळे व उर्वरित जमीन बागायत होण्याची शक्यता असल्यामुळे संमती लिहून दिली. मात्र महादूनं साफ इन्कार केला !

 आणि ज्या गावानं एकेकाळी बांगला देश युद्धात अतुलनीय पराक्रम केल्याबद्दल वीरचक्र मिळालं म्हणून त्याचा सत्कार केला होता आणि ग्रामपंचायतीनं ‘जय जवान - जय किसान' कीर्तिस्तंभ उभारला होता, त्यांच्या नजरेतून तो यामुळे एकाएकी उतरला गेला. कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न होता, भुकेचा प्रश्न होता !

 त्यानं खूप तळमळून यातला गैरप्रकार व दाजिबाचा दुटप्पीपणा सांगायचा प्रयत्न केला, पण दाजिबा गावक-यांना बहकावण्यात चांगलाच यशस्वी झाला होता. त्यांचा उलट असा समज झाला की, गावचं विकासाचे - पाझर तलावाचं काम महादूच्या आडमुठेपणामुळे होत नाही आणि तोच मजुरांच्या उपासमारीला जबाबदार आहे.

 गावक-यांची बदललेली नजर महादूला विद्ध करीत होती, पण तो ठाम होता. त्यानं या अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं. गावचा रेशन दुकानदार त्याचा बालमित्र होता. त्याच्याशी बोलताना महादू निश्चयी सुरात म्हणाला होता -

 'मी लढवय्या आहे. माझ्यावर पाझर तलावाची अलाईनमेंट बदलून मुद्दाम अन्याय करण्यात आला आहे. त्याविरुद्ध मी लढत आहे; पण वाईट याचं वाटतं की, हे गावकरी का समजून घेत नाहीत? त्यांच्या हाताला काम नाही हे मलाही फील होतं, पण मी तरी काय करू? गावासाठी त्याग करा म्हणणारे हे भोंदू - पोट भरलेले पुढारी स्वतःची जमीन का देत नाहीत?'-

 आज गावात तालुक्याचे तहसीलदार व बी. डी. ओ. साहेब येणार होते, पाझर तलावासाठी महादूची संमती मिळवण्यासाठी. मघाशी शेतातच कोतवाल येऊन खबर देऊन गेला होता.

 म्हणून आज न्याहरीत त्याचं मन नव्हतं. घास तोंडात फिरत होता. आवडानं केलेली फर्मास दही - भाकरी त्याला जात नव्हती. घुम्यासारखा तो बसून होता आणि त्याची ही अवस्था पाहून आवडा अवघडली होती.

 कशीबशी त्यानं न्याहरी आटोपली. नेहमीच्या सवयीनं आंघोळ केली आणि कपडे करून तो समोरच्या खोलीत बाजेवर अस्वस्थ पडून राहिला.

 काही वेळानं तो भानावर आला, तो आवडीच्या हाकेनं. ‘धनी, कोतवाल आलाय जनू. तुमास्नी चावडीवर बोलविलंय... बिगी बिगी.'

 'ठीक आहे, मी येतो म्हणून सांग!' बाजेवरून तो उठत म्हणाला. दारातूनच परत आला आणि कसल्याशा विचारानं त्यानं पेटीतून आपला कडक लष्करी ड्रेस काढला, वीरचक्र पदक काढलं. ते छातीवर लावून ऐटबाज चालीनं तो काही क्षणांतच चावडीमध्ये पोचला.

 तिथं चावडीसमोरच्या पटांगणात खुर्चीवर तहसीलदार व बी. डी. ओ बसले होते. त्यांच्या बाजूला सरपंच दाजिबा पाटीलही बसला होता.

 महादूनं कडक सॅल्यूट ठोकला व आपला हात पुढे करीत म्हणाला,


लढवय्या /२३