पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भानावर येताच ती लगबगीनं उठली. प्राणपाखरू उडून गेलेल्या आपल्या प्रिय रमावहिनीच्या व नवजात अर्भकाच्या कलेवराकडे तिनं एकवार डोळाभरून पाहिलं व ती बाहेर आली.

 ट्रक निघून गेला होता. साऱ्यांचं पाणी भरून झालं होतं.

 ती आपल्या झोपडीजवळील पाण्याने भरलेल्या रांजणाजवळ आली आणि बादलीनं पाणी घेऊन ती आपल्या शरीरावर उपडी करू लागली व सचैल न्हाऊ लागली. एक रांजण पाणी संपून गेलं, तरी बेभानपणे ती न्हातच होती.

 सोजरमावशीनं तिला कळवळून विचारलं, 'पोरी, हे काय करतेस गं? भानावर ये...'

 ‘मी, मी... माझ्या देहाचं उदक दिलं पाण्यासाठी... माझी वहिनी बरी व्हावी व बाळाला जीवन लाभावं म्हणून. पण दोघंही मला सोडून गेले. आता हे उदक, हे पाणी डोईवर घेऊन सचैल न्हातेय त्यांच्यासाठी; आणि... आणि या देहाचा ओंगळपणा जाण्यासाठी...!'

 आणि बोलता बोलता तिचा स्वर कापरा झाला, मन व डोळे दोन्ही पाझरू लागले आणि तशीच ती सोजरमावशीच्या दुबळ्या मिठीत कोसळली...

 ‘मावशे... मावशे...!"

☐☐☐

पाणी! पाणी!! / २११