पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहात शेती, शेतकरी, पाणी टंचाई, गावगाडा आणि शासकीय यंत्रणेसंबंधी परवडीच्या कथा आहेत.

आज उजाड होत चाललेली खेडी आणि तिथल्या माणसांचे जिकरीचे जगणं लेखकाने विविध कथांतून समर्थपणे मांडले आहे.

आज पाणी प्रश्नाने सर्वांची झोप उडविली आहे. अशा वेळी श्रीमंत धनलांडग्यांनी गरीबांचे पाणी तोडणे, फळबाग योजनांचा मलिदा फक्त काहींच्या पदरी पडणे, रोजगार हमी योजनेत घाम गाळणाच्या स्त्री जातीची होणारी घुसमट, भूकबळी झालेल्या ठकूबाईना कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरविणे, सर्व मार्गानी पैसा कमावण्याची सर्वच क्षेत्रातील माणसांना चढलेली नशा, दोन घोट पाण्यासाठी म्हातारीला जीव गमवावा लागणे, पाण्यापेक्षाही गावाच्या आरोग्याची परवड होणे आणि सर्वच क्षेत्रातील ध्येयवाद्याची आज होणारी गोची, हे एक समान कथासूत्र लेखक विविध कथांतून सांगत आहेत.

एका अर्थाने ही आजच्या ग्रामीण भागाच्या वर्तमानाची कथा आहे. सर्वत्र बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्येही काही ध्येयांची हिरवळीची बेटंही आहेत आणि तेच समाज जीवनाला जिवंत ठेवण्याचे काम करत असतात. हे जीवनमूल्य लक्ष्मीकांत देशमुखांच्या कथासंग्रहाचे वेगळेपण आहे.

- ना. धों. महानोर