पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हातानं पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. न जाणो, तो ट्रक घेऊन वर येत नाही म्हणाला तर.. तिच्या नजरेसमोर तळमळणारी व प्रसूति वेदना सहन करणारी रमावहिनी आली, तिचं तप्त पोळणारं शरीर आठवलं आणि सोजरमावशीचे शब्द - ‘पोरी, दोन बादल्या पानी हवं. काय बी कर, लय गरज हाय तेची... ह्या रमेचा ताप वाढतुया. तो कमी करण्यासाठी पानी हवं... नाय तर मला इपरीत व्हण्याची भीती वाटते...'

 ड्रायव्हरनं तिला हात देऊन ट्रकच्या केबिनमध्ये खेचलं. त्यावेळी कौशल्यानं त्याने तिला एक झटका दिला व हात सोडला, तशी बेसावध प्रज्ञा त्याच्या अंगावर कोसळली. त्यानं संधी सोडली नाही व तिला गच्च मिठी मारली.

 इब्राहिमच्या कित्येक दिवस आंघोळ नसलेल्या, घामेजलेल्या, वास मारणाऱ्या शरीराचा दर्प प्रज्ञाच्या अंगांगावर किळस पेरून गेला. ती आक्रसली गेली व म्हणाली, ‘ड्रायव्हरसाहेब, हे... हे बरं नाही. प्लीज, मी फार परेशान आहे... माझी वहिनी तिकडं तडफडतेय, प्लीज. लवकर गाडी सुरू करून पहा.'

 'ठीक है मेरी जान. मैं कोशिश करता हूँ.

 त्यानं तिच्यापासून अलग होत म्हटलं आणि स्टिअरिंग हाती घेऊन चावी फिरवायला आरंभ केला. ट्रक नुसताच दोन-दीनदा गुरगुरला व थांबला. 'नहीं प्यारी, अभी इंजन गरम है. ठहरना पडेगा....।

 ते कितपत खरं होतं कोण जाणे; पण प्रज्ञानं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एक एक क्षण तिच्यासाठी जीवघेणा होता. वहिनीच्या काळजीनं जीव कसनुसा होत होता, तर ट्रकमध्ये इब्राहिमची शारीरिक लगट तिच्या स्त्रीत्वाचे लचके तोडीत होती. तरीही तिला ते निमूटपणे सहन करावं लागत होतं.

 पुन्हा इब्राहिम तिच्याजवळ सरकला. त्याचा राकट हात तिच्या देहाचे वळसे व वळणं शोधू लागला, चाचपू लागला. तसा तिनं प्रतिकार केला, ‘नको, नको, हे बरं नाही ड्रायव्हरसाहेब..."

 ये प्यार - मोहब्बत है मेरी जान... हम दोनो जवान हैं और ऐसा तनहा मौका बार बार नहीं आता!' त्याच्या स्वरातून वासनेची प्रच्छन्न लाळ गळत होती.

 'पण तिकडं माझी वहिनी मरणाच्या दारात आहे. प्लीज, माझं मन नाही ड्रायव्हरसाहेब...'

पाणी! पाणी!! / २०८