पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इब्राहिम काही क्षण तिला आरपार न्याहाळीत राहिला व मग गुरकावीत म्हणाला, 'ठीक है, ये ट्रक फिर वापस जायेगा. ऊपर नहीं आयेगा. इसमें इतने फॉल्ट है कि, मैं ही सिर्फ उसे चला सकता हूँ। ये जोखीम मैं सिर्फ तुम्हारी मोहब्बत की खातिर उठाता हूँ, समझी! तुम नहीं चाहती हो तो...

 ‘नाही, नाही... माझ्या बोलण्याचा तो मतलब नाही ड्रायव्हरसाहेब...' प्रज्ञा म्हणाली, 'मी - मी, मला - मला....'

 ठीक है, कुछ बोलने की जरूरत नहीं है प्यारी....

 इब्राहिमनं तिची असहायता पुरेपूर ओळखली होती. एक कुंवार स्त्री त्याला विनासायास मिळत होतं - केवळ पाण्यासाठी. 'वाह रे मालिक, अजीब दस्तूर है तेरा!'

 पण या रस्त्यावर व यावेळी त्याची अभिलाषा पूर्णपणे पुरी होणं शक्य नव्हतं, तरीही तिच्या शरीराशी त्याला मनसोक्त खेळता आलं. दहा मिनिटे का होईना तिला मिठीत घेऊन तिचा कुंवारा गंध त्याला लुटता आला.

 या दहा मिनिटात एक स्त्री म्हणून ती पुरुषाच्या पशुरूपाच्या दर्शनाने अनेकवार जळून खाक झाली होती. तिच्या मनात एवढा संताप, एवढी अगतिकता दाटून आली होती, की तिला शक्य असतं तर तिनं इब्राहिमचा कोथळा फाडला असता, त्या ट्रकला आग लावली असती आणि मनसोक्त रडली असती. आता इब्राहिमनं तृप्त मनानं चावी फिरवताच ट्रक चालू झाला व दोन - तीन मिनिटात तो तांड्यावर आला.

 सारे जण ‘पाणी आलं - पाणी आलं' म्हणून धावू लागले; पण इब्राहिमनं प्रथम तिला पाणी भरून घ्यायला सांगितलं. तिनं क्षणापूर्वीचं सारं विसरून उत्साहानं दोन्ही रांजण पाण्यानं भरून घेतले. तो पाईपमधून पडणारा पांढराशुभ्र फेसयुक्त जलौघ पाहून तिचे डोळे व काही प्रमाणात मनही निवून निघालं.

 पाणी भरून होताच ती आपल्या झोपडीकडे धावली आणि दारातच सोजरमावशी गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली पाहिली... आणि प्रज्ञा थरकापली.... मनात एकाच वेळी अनेक पापशंका चमकून गेल्या.

 'मावशे, मावशे, काय झालं?'

 ‘पोरी...' मान वर करीत थरथरत्या आवाजात सोजरमावशी म्हणाली, 'लई येळ झाला. रमाचा ताप तू गेल्यावर वाढतच गेला,... आनी तिला वाताचे झटके आले... आनी पोराला जनम देताच तिनं डोळे मिटले....' ।

पाणी! पाणी!! / २०९