पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टेकडीची सरकारदरबारी गायरान म्हणून नोंद होती. इथं कसलीही सोय नव्हती, तरीही त्यांना इथं येऊन राहावं लागलं होतं - वेगळा तांडा करावा लागला होता.

 या टेकडीच्या दक्षिण टोकाला उभं राहिलं की अवघी पंचक्रोशी दिसते. खाली वसलेलं गाव एका दृष्टिक्षेपात नजरेत सामावतं. मात्र रस्ता नसल्यामुळे वळणावळणानं जावं लागतं. हाही रस्ता झाला तो टँकरच्या सतत येण्या - जाण्यामुळे पण खाचखळगे व दगडगोट्यांनी भरलेला हा रस्ता टँकरला पण सोसत नसे.

 टँकरचा लोचट ड्रायव्हर इब्राहिम एखदा हसत प्रज्ञाला म्हणाला होता, ‘मेरी जान, दूसरा कोई यहा टँकर नहीं ला सकता. ये बंदा ही सिर्फ ये काम कर सकता है, उसकी वजह भी सिर्फ तुम हो प्यारी - सिर्फ तुम!'

 त्याची ही सलगी प्रज्ञाला रुचत नसे, पण सहन करावी लागायची. कारण तो त्यांच्या तांड्याला जवळपास बारा महिने टँकरने पाणी पुरवायचा. या भागात पाणी लागत नाही, असं भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितलं होतं. पर्याय म्हणून एक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित होती; पण अवघ्या सत्तर घरांसाठी एवढी मोठी योजना मंजूर होत नव्हती. तांड्याचे पुढारी किसन रणबावळे पंचायत समिती कार्यालयात खेटे मारून मारून थकले होते.

 तांड्याचं सारं अस्तित्वच मुळी टँकरच्या पाण्यावर अवलंबून होतं. तरी एक बरं होतं, गतवर्षी नव्यानं बदलून आलेल्या बी. डी. ओ. नं पाहणी केल्यानंतर टँकर बारमाही केला होता.

 बी. डी. ओ. च्या त्या भेटीत प्रज्ञानं त्यांना सांगितलं होतं ‘साहेब, हा तांड्यावर येणारा रस्ता तरी रोजगार हमीतून करून द्या... म्हणजे टँकर धडपणे वरपर्यंत येत जाईल. नाही तर आज अशी अवस्था आहे की, दोन-तीन दिवसाला एकदा टँकर कसाबसा येतो. वर येता येता बिघडतो - मग पुन्हा आमची पंचाईत. साहेब, पोटाला भूक दिवसातून दोनदाच लागते; पण या उघड्या माळावर व अशा प्रखर उन्हात पाणी पुन्हा पुन्हा लागतं. भाकरी कमवावी लागते. ती पुरेशी नसते, मग पाणी तरी घोटभर मिळावं साहेब!'

 बी. डी. ओ. अवाक् होऊन तिच्याकडे क्षणभर पाहात राहिले. मग म्हणाले, "बरोबर आहे, बाई तुमचं. मी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्कीमचा पाठपुरावा जरूर करतो. मग रोजगार हमीतून रस्ताही प्रस्तावित करतो तहसीलदाराकडे.' ब-याच

पाणी! पाणी!! / २००