पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्नांनी रस्ता मंजूर झाला होता; पण काम सुरू होऊन अवघ्या आठ दिवसांतच बंद पडलं होतं. कारण रस्त्याच्या जागी कठीण खडक होता व खडी फोडत रस्ता करणं जिकिरीचं काम होतं. जवळच बंडिगचं मेहनतीला कमी असलेलं काम सुरू होतं. तिथं सारे मजूर वळले व हे काम मजूर नसल्यामुळे बंद पडलं.

 प्रज्ञानं तांड्यावरील आपल्या भावाबहिणींना कितीदा तरी विनवलं होतं, 'हा रस्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा तांडा इथं कायमस्वरूपी वसावा असं वाटत असेल, तर आपणच हे जिकिरीचं काम केलं पाहिजे. मला माहीत आहे, हे काम अवघड आहे. मजुरीही बंडिंगपेक्षा कमी मिळते. तरीही केलं पाहिजे. निदान पाण्याचा टॅकर वेळेवर नीटपणे यावा यासाठी हा रस्ता हवा!'

 तिच्या तांड्यावरील नवबौद्ध बांधवांना ते पटत नव्हतं थोडच? पण सतत मोलमजुरी करणाऱ्या व काळ्या हायब्रीडच्या भाकरीचं भोजन करणाऱ्या हाडात व पाठीशी गेलेल्या पोटानिशी जगणाऱ्या देहात मेहनतीचं काम करण्याची ताकद उरली नव्हती. पुन्हा आज रस्ता नसतानाही टँकर येत होताच; म्हणून त्याची तीव्रता जाणवत नव्हती.

 तांड्याचे नेते किसन रणबावळेनी तिची पाठ थोपटीत म्हटलं होतं, ‘बाबानू, ही पोर म्हंतेय ते समदं खरं हाय. ह्यो रस्ता व्हायलाच हवा. गावातले मजूर नाय येणार या कामाला... त्यांचा बहिष्कार हाय.. नाही!'

 ‘पण दादा, लय जिकरीचं काम हाय. अन् बंडिंगच्या कामावर मजुरीबी जादा मिळते....' एक म्हणाला.

 ‘आनी हे रस्त्याचं काम थोडंच पळून जातं? बंडिगचं काम झाल्यानंतर करूकी...' दुसऱ्यानं म्हटलं. आणि साऱ्यांनी मग 'हो हो, ह्ये बेस हाय.' असं म्हणत दुजोरा दिला व तो विषय तिथंच संपला. प्रज्ञा मात्र हताशपणे त्यांच्याकडे पाहत राहिली.

 किसन रणबावळे मग तिची समजूत काढीत म्हणाले होते. ‘ए जाऊ दे पोरी, तू नगं इतका इचार करू... इथं आल्यापासून मात्तर तू निस्ती रिकामी हायंस... या तांड्यावर मॅट्रिक शिकलेली एकमेव पोर तू... भीम्याच्या सौंसारात खस्ता खातीस... मह्या मनात हाय इथं एक बालवाडी सुरू करावी. तू इथल्या लहान पोरास्नी शिकवू शकशील....!'

पाणी! पाणी!! / २०१