पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 परशूचे डोळे पाहाता पाहाता भरून आले. तो बाहीनं ते कोरडे करायचा प्रयत्न करतो, पण विकल मनाला आवर घालता येत नाही, त्यामुळे डोळे पाझरायचे ते पाझरतच...

 त्याला आपला जमिनीचा भकास, विराण तुकडा आठवत असे. दोन वर्षे अपुल्या पावसानं शेती पिकली नाही... आणि मंजूर झालेली शासनाची जीवनधारा विहीर म्हणजे केवळ एक खोल खड्डाच झालाय. दिलेल्या बजेटमध्ये खडक मध्ये आल्यामुळे जेमतेम दहा मीटरच खाली जाता आलं. जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतात की पंधरा मीटरवर पाणी आहे. गावातल्या एका पायाळू बामणानं इथं पाणी नाही असा छातीठोकपणे निर्वाळा दिला आहे. त्यामुळे उरलेलं खोदकाम करण्यासाठी बँकेचे कर्ज काढायला जीव धजावत नाही; कारण मागचंच पंधरा हजाराचं कर्ज... सरकारने दहा हजार माफ केलं असलं तरी उरलेलं फेडायचं आहेच की....।

 त्यामुळे त्याच्या आसुसलेल्या, तहानलेल्या जमिनीला पाण्याचा टिपूस नाही. अपु-या पावसामध्ये पेरलेली हायब्रीड नुसतीच उगवली, दाणा भरलाच नाही. फक्त दीड-दोन महिने दोन्ही बैलांच्या चा-याची तेवढी सोय झाली, पण परशू व त्याच्या कुटुंबाला फाके पडून मजुरीच्या कामासाठी बाहेर पडावं लागलं. बायको व वयात आलेली पोरं बंडिंगच्या मातीकामावर जाते, सातवीतून शाळा सोडलेला शिर्पा पाटलाची गुरं वळीत रानोमाळ हिंडतोय व आपण या चंपकशेठच्या मळ्यात सालगडी म्हणून राबतोय.

 सारं शिवार उजाड व वैराण बनलेलं... जिथवर नजर घालावी तेवढं रान काळपटलेलं, रखरखीत.

 अपवाद होता चंपकशेठच्या मळ्याचा. तो बारा एकरांचा मळा ठायी ठाम हिरवागार बहरलेला, आणि याचं कारण याच एच. पी.ची मोटार सतत बारा घंटे चालली तरी न उपसा होणारं पाणी.

 ही विहीर चंपकशेठनं चक्क ओढ्यामध्ये बांधून तेवढा भाग दगडी पीचिंगन आपल्या मळ्याला जोडून घेतला होता. ओढा व सरकारच्या मालकीचा. इथं फक्त तेच विहीर बांधू शकतं, तेही पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पण शेठचा हात वरपर्यंत पोचलेला. त्यांन म्हणे प्रांतसाहेबाकडून अपिलास स्टे घेतला होता.

 जणू साऱ्या गावाचं पाणी याच एका विहिरीत झिरपून पाझरत आलंय--- सारा गाव, साऱ्या गावचं शिवार तहानेनं व्याकूळ झालंय... आणि इथे मात्र जमिनीला उमाटा फुटावा एवढं जादा पाणी खळाळलंय...

पाणी! पाणी!!/ ११४