पान:पाणिपतची बखर.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) पानिपतचा रणसंग्राम' प्रस्तुत संपादनात संदर्भासाठी वापरले आहेत याचा निर्देश करावासा वाटतो. पहिल्या ग्रंथात प्रा. न. र. फाटक व सेतुमाधवराव पगडी यांनी फार्शी साधनांचा अनुवाद दिला आहे त्याचा उपयोग झाला तर दुस-या ग्रंथात भाऊसाहेबांची काही नव्याने उपलब्ध झालेली पत्रे पानिपत प्रकरणावर नवा प्रकाशझोत टाकण्यात उपयुक्त ठरली. । ऐतिहासिकतेपेक्षा या बखरीबाबत कलात्मकताच वरचढ ठरली असल्याने कलात्मकतेचे विविध पैलू विस्ताराने विवेचले आहेत. रसाविष्कार व्यक्तिचित्रे, वर्णनकौशल्य, निवेदनकौशल्य, भाषाशैली आणि रघुनाथ यादवाचा व्यक्तित्त्वाविष्कार हे या बखरीचे तेजस्वी पैलू आहेत. वेधक व भेदक तपशिलातून मूर्त होणारे प्रत्ययकारी युद्धाचे चित्रण, प्रभावी मनोदर्शन आणि त्यातून इतिहासातील घटनात्मक सत्यापलीकडच्या मानवाच्या भावसत्यापर्यंत मजल गाठण्याचे रघुनाथ यादवाचे कौशल्य यामुळे बखरीची उंची वाढली आहे. बखरवाङ्मयाकडे केवळ गौरवपूर्ण वा तुच्छतापूर्ण दृष्टीने न पाहता विशुद्ध चिकित्सात्मक दृष्टीने पहावे ही या संपादनामागील भूमिका आहे. इतिहास व ऐतिहासिक कादंबरी यांच्या सीमारेषेवरील या वाङमयप्रकाराकडे समतोल दृष्टीने पाहणे म्हणजे खरोखर तारेवरची कसरतच होय. तरीही हा प्रामाणिक प्रयत्न जिद्दीने केला आहे. प्रस्तुत बखरीच्या संपादनात भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रा. ग. ह. खरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले याची कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य अडचणीमुळे पाणिपतच्या बखरीचे मुद्रण घाईने उरकले असल्याने अनवधानाने काही मुद्रणदोष राहिले असण्याची शक्यता आहे. वाचकांनी याबद्दल क्षमा करावी. । दिनांक डॉ. सौ. कुसुम कुलकर्णी मनोहर भवन । १४४४ सदाशिव, पुणे ३०. २०--११-७१