पान:पाकिस्तानचे संकट.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट हे हिंदुस्थानचे ध्येय निश्चित असल्याचे बादशाही आश्वासनहि त्यांनी वाचून दाखविले. कौन्सिलांवर काँग्रेसने बहिष्कार घातला तरी कौन्सिले ओस पडली नाहीत. युरोपांतल्या परिस्थितीच्या चांचल्याकडे लक्ष देणारे व 'स्वराज्य म्हणजे सैनिक-सत्ता' हे सूत्र लक्षात ठेवणारे सर शिवस्वामी अय्यर यांच्यासारखे लोक लष्करी खर्च कमी करण्याबद्दलचा व सैन्याचे हिंदीकरण करण्याचा लकडा सरकारच्या मागे लावू लागले. लोकांच्या आकांक्षांच्या मानाने नवीन सुधारणांनी दिलेले अधिकार अपुरे आहेत हे मत वरिष्ठ व प्रांतिक कायदेमंडळांतूनहि अधूनमधून ऐकू येऊ लागले. इकडे असहकाराची चळवळ जोरांत चालूच होती. युवराजांच्या आगमनावर बहिष्कार घालण्याची चळवळ जोरावली. अशा चळवळी चालवितांना अहिंसेचे वातावरण संपूर्णपणे टिकलें पाहिजे असा आग्रह गांधीजी धरीत असले तरी, सामुदायिक व्यवहारांत तो आग्रह टिकू शकत नव्हता. युवराजांच्या आगमनप्रसंगी मुंबईत मोठा दंगा झाला. युवराज पुष्कळ ठिकाणी गेले; पण फार ठिकाणी त्यांच्या आगमनप्रसंगी कडक हरताळ पडले! राजघराण्यांतील प्रमुख व्यक्तींच्या आगमनाचा प्रसंग व्यवस्थितपणे पार पाडण्यावर हिंदुस्थानांतल्या बड्याछोट्या नोकरांची इभ्रत अवलंबून असल्यामुळे, हा हरताळ नोकरशाहीला फार जाणवला. या परिस्थितीचा देशाला फायदा मिळवितां आला असता ! त्या वेळचे लॉ मेंबर सर तेज बहादूर सत्रु हे मध्यस्थी करू लागले. सरकार पक्षांतील प्रमुखांची व लोकनायकांची गोलमेज परिषद व्हावी आणि देवाणघेवाणीच्या धोरणांतून प्रांतिक कारभारांतली बरीचशी राखीव खाती सोंपीव व्हावी असा हेतु या प्रयत्नांच्या मागे असावा. दासबाबूंची या प्रयत्नांना मान्यता होती ; पण गांधीजींनी मान्यता न दिल्यामुळे हे प्रयत्न थंडावले व शेवटी निष्फळ ठरले ! देशांतली चळवळ चालूच राहिली. मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या धरपकडी होऊ लागल्या. ज्यांच्या वैभवामुळे संयुक्त प्रांताचा गव्हर्नरहि दिपून जात असे अशा पं० मोतिलालजी नेहरूंसारख्या मान्यवर पुढाऱ्यांपासून तो झोपडीत राहून कणीकोंड्याचे कष्टांचे वैभव सहन करणाऱ्या खेडुतापर्यंत सर्व दर्जाची हजारों माणसें सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलूवागू लागली आणि निर्भयपणे तुरुंगाचा मार्ग आक्रमू लागली! .