पान:पाकिस्तानचे संकट.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ - पाकिस्तानचे संकट असें हिंदूंनी म्हटले तर ते चुकेल की काय, या प्रश्नाचे उत्तर डॉ. आंबेडकर देतील तर हिंदूंना ते हवें आहे. . हिंदुस्थानांत एका सार्वभौम सत्तेऐवजी अनेक सार्वभौम सत्ता निर्माण झाल्यामुळे केवढा धोका उत्पन्न होण्याचा संभव आहे हे ज्ञानकोशकार डॉ० केतकर यांनी यापूर्वीच सूचित करून ठेविलें आहे.* निजामच्या राज्याला स्वतंत्र सार्वभौम सत्तेचे स्थान मिळावे आणि उत्तर भारतांत एक आणि पूर्व भारतांत एक, अशी दोन सार्वभौम मुसलमानी राज्य निर्माण करावी असा पाकिस्तानवाल्या मुसलमानांचा डाव आहे. हा डाव सफल झाला तर, राष्ट्रसंघांत सर्व हिंदुस्थानचा फक्त एक प्रतिनिधि आणि या तीन इस्लामी राज्यांचे तीन प्रतिनिधि अशी परिस्थिति निर्माण होईल हा संभवहि विसरून चालणार नाही. पाकिस्तान निर्माण झाले म्हणजे थोडक्याच काळांत पाकिस्तानमधील सार्वभौम मुसलमानी राज्यांचे परराष्ट्रीय संबंध स्वतंत्रपणे चालावे असें मुसलमानांना वाटत आहे. या स्वतंत्र परराष्ट्रीय संबंधांची वाढ हिंदुस्थानला घातक होणार नाही अशी हमी कोण देऊ शकणार आणि ती कोणी दिली तरी, हिंदूंनी ती कां मान्य करावी? या विचारसरणीत आणखी पुष्कळच महत्त्वाचे मुद्दे दडून बसलेले आहेत. पण, त्या सर्वांचाच उच्चार आजच करणे हितावह नसल्यामुळे, तूर्त डॉ० आंबेडकरांना एवढाच प्रश्न विचारावासा वाटतो की, या दृष्टीने विचार करूनहि ते त्यांच्या पाकिस्तानला मान्यता देणार आहेत काय? हिंदुस्थानांत नांदणारे बहुसंख्य हिंदु हे आक्रमक वृत्तीचे आहेत आणि म्हणून इतर अल्पसंख्याक वर्गांना त्यांच्यापासून धोका आहे, असेंहि एक मत डॉ० आंबेडकरांनी नमूद केले आहे. बहुसंख्य हिंदूंना आक्रमक (Aggressive) हे विशेषण लावण्याची इच्छा डॉ. आंबेडकरांच्याहि मनांत आहे की काय, हे त्यांच्या लिहिण्यावरून तितकेंसें स्पष्ट झालेले नाही. या मुद्याचा विचार करतांना त्यांनी ज्या एका घटनेवर भर दिला आहे ती घटना या मुद्याच्या विवेचनांत गैरलागू आहे. हिंदुसमाज आक्रमक वृत्तीचा आहे की काय हे ठरवितांना, अडीच तीन वर्षे प्रांतिक कारभार करतांना काँग्रेस मंत्रिमंडळांनी काय केलें हा मुद्दा विचारांत घेण्याचेंहि वस्तुतः कारण नाही. * ज्ञानकोश, प्रस्तावना खंड, विभाग पहिला, पृ० ६२.