पान:परिचय (Parichay).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंथन । ७९

वारकऱ्यांच्या तोंडी आहे. नामदेवापासून कितीजणांनी पांडुरंग युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे याची नोंद केली असेल त्याला गणती नाही. प्रश्न इतकाच आहे की, 'युगे अठ्ठावीस' या शब्दावलीचा अर्थ काय ? प्राचीन मराठी साहित्याचे गाढे व्यासंगी असणारे माझे एक मित्र आहेत. त्यांचे म्हणणे असे की, चार वर्षांचे एक युग होते. अठ्ठावीस युगे म्हणजे एकशे बारा वर्षे. पांडुरंग नामदेवाच्या पूर्वी एकशे बारा वर्षांपासून विटेवर उभा आहे. पुंडलिकाचा काळ नामदेवापूर्वी इतका जुना असावा. आता या विवेचनाला पुरावा काय? तर 'शोधतो आहे ! लवकरच सापडेल,' असे या आमच्या मित्राचे विश्लेषण. 'युगे' च्या ऐवजी 'उगे' हा पाठ असावा, आणि अठ्ठावीस म्हणजे वेदशास्त्रेपुराणे असावीत ही कल्पनाही अशीच आहे, म्हणजे पुरावा नसणारी आहे. देहूकरांची कल्पना अशी की, अठ्ठावीस हा वाकप्रयोग आहे. अतिप्राचीन, अनादि या अर्थाचा. आणि त्याला पुरावा म्हणून त्यांनी रामानुजांच्या गीताभाष्यातील उल्लेख दिलेला आहे. मी या प्रश्नावर एवढेच म्हणू इच्छितो की, आजवर 'युगे अठ्ठावीस' या शब्दावलीचा उलगडाच होत नव्हता; रामानुजांच्या गीताभाष्यामुळे आता दिशा सापडलेली आहे. व्यक्तिशः मला देहूकरांचा अर्थ पटतो. पण पुरावा पुरेसा वाटत नाही. रामानुजांखेरीज मागेपुढे असा इतर कुणीतरी अठ्ठावीस या संख्येचा असा वापर केलेला दाखवला पाहिजे. एक बलवान पुरावा समोर आलेला आहे हे मला दिसते आहे. पण महाराष्ट्राबाहेरच्या एका सुटया उल्लेखाच्या आधारे 'अनंत' असा अर्थ लावण्याची ती सर्वमान्य रूढी होती, असे मी मानणार नाही. अजून काही जणांनी 'अठ्ठावीस' हा शब्द असा वापरल्याचे दाखवायला हवे. म्हणजे हा अर्थ निर्णायक होईल. या क्षणी तरी मी 'जवळजवळ सिद्ध' इतकेच म्हणून थांबेन.
 जे संकेत रामानुजात आहेत पण इतरत्र फारसे नाहीत ते नामदेवात, ज्ञानदेवात आढळू लागले म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होतात. वैष्णव भक्तिसंप्रदायाचे परस्परसंबंध हा भासतो तितका सोपा विषय नाही.


 असाच एक प्रश्न चक्रधरांनी उल्लेखिलेले 'आचार्य' कोण आहेत. हा आहे. एकेकाळी डॉ. वि. भि. कोलते 'आचार्य' म्हणजे शंकराचार्य असे मानीत. प्रा. निपाणीकर अजूनही तसेच मानतात, असे देहूकरांचे म्हणणे आहे. माझ्यासमोर या क्षणी 'नवभारत' चा जून १९८१ चा अंक आहे. सदर अंकात पृष्ठ ५२ वर निपाणीकरांनी आपण भट्टाचार्य म्हणजे कुमारिल भट्ट मानतो हे स्पष्ट केले आहे. म्हणजे आता चक्रधरोक्त आचार्य हे कुमारिल भट्ट होत यावर देहूकर, कोलते आणि निपाणीकर यांचे एकमत झालेले दिसते. मग वाद कुठे राहिला?