पान:परिचय (Parichay).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महानुभाव वाङमयाचे संशोधन । ४१

समजली त्याप्रमाणे मी ती कल्पना नोंदवितो. त्यात काही चुकभूल झाल्यास ती माझी समजावी.
 भाऊसाहेब कोलते हे पीढीपाठाचे अभिमानी आहेत. ह्या अभिमानाचे कारण इतर कोणतेही नसून फक्त एकच आहे की, तळेगावकर पाठ व वाईदेशकर पाठ हे उत्तरकालीन आहेत. कोलते ह्यांनी तळेगावकरपाठ शके १३५० च्या आसपास तयार झाला, असे मत दिले आहे. वाईदेशकर पाठाची कोलते ह्यांना उपलब्ध झालेली जुनी प्रत सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा वाईदेशकर पाठही जुना आहे हे उघड आहे. हा पाठही सहजच शकाच्या पंधराव्या शतकात नेऊन बसवावा लागेल. तेव्हा तीनही पाठ पुरेसे प्राचीन आहेत. कोलते ह्यांचे मत असे की, लीळाचरित्राच्या शके १५०० पूर्वीच्या उपलब्ध असणाऱ्या सर्व पोथ्या गोळा कराव्यात. ही सर्व प्राचीन हस्तलिखिते आहेत. ह्या हस्तलिखितांच्या आधारे प्रमाण प्राचीन पाठ ठरवावा. प्रक्षेपही ह्यामुळे निश्चित होतील. ह्याप्रमाणे आपण प्रमाण लीळाचरित्राच्या अधिकृत आवृतीकडे जाऊ शकतो. जास्तीत जास्त प्राचीन अशा अनेक हस्तलिखितांच्या आधारे अधिकृत पाठ निश्चित करावा हा राजमार्ग आहे, व तोच कोलते ह्यांच्या समोर आहे. तेव्हा ही भूमिका महत्त्वाची व शास्त्रशुद्ध आहे ह्यात वादच नाही.
 पण वाद निराळा आहे. कारण पीढीपाठ जुना आहे, असे पीढीपाठ मानणाऱ्यांचे म्हणणे आहे. तळेगावकर व वाईदेशकर परंपरेचे महंत आपला पाठ उत्तरकालीन व वाढविलेला आहे असे थोडेच मान्य करणार ? सर्वचजण स्वतःच्या पाठाचा अस्सलपणाच आग्रहाने सांगणार. बरे, कित्येकदा असे दिसते की, इतर पाठांतील माहिती सर्वांना स्वीकारावीच लागते. चक्रधरस्वामींचे चक्रधर हे नावच पीढीपाठाच्या आधारे आलेले नसून तळेगावकर पाठाच्या आधारे आलेले आहे. स्वामींचे चरित्र सांगताना अनेकदा वाईदेशकर पाठाचा स्वीकार करणे भाग असते. अलीकडे असेही आढळून येऊ लागले आहे की, वाईदेशकरपाठात अनेकविध प्रकारची महत्त्वाची माहिती आहे. लीळाचरित्राची जी पीढीपाठाची म्हणून हस्तलिखिते असतात त्यात पीढीपाठात प्रमाण नसणारा पुष्कळ मजकूर आढळतो. ह्यामुळे पोथ्या उत्तरकालीन असल्या तरी त्यात महत्त्वाची प्राचीन माहिती संग्रहित झालेली दिसते. प्रक्षेप व परिवर्धन म्हटले तरी त्याला काही कारणे असणारच. चक्रधरांना भेटलेली मुक्ताई योगिनीच घ्या. ही मुक्ताई योगिनी, विक्रमाची भावजय व धारानगरीच्या राणीवशातील दिसते. ही माहिती पीढीपाठात नाही. पण वाईदेशकर पाठात आहे. आणि ती माहिती प्राचीन परंपरेने आलेली व खरी माहिती दिसते. म्हणन डॉ. ढेरे ह्यांचे मत असे आहे की, परंपरांचा विचार न करता प्रतीचा विचार प...३