करावा व एकूण उपलब्ध लीळाचरित्राच्या पोथ्यांमधील एकूणएक पाठ नोंदविणारी आवृत्ती काढावी. अशा आवृत्तीशिवाय धर्मपरंपरेचा अभ्यास नेमकेपणाने करता येणार नाही, सांस्कृतिक इतिहासातील रहस्ये उलगडणार नाहीत, असे ढेरे यांना वाटते. परंपरेने वाढत जाणाऱ्या ग्रंथाच्या प्रती सिद्ध करण्यासाठी ढेरे यांची पद्धत अधिक महत्त्वाची आहे, असे मला वाटते.
लीळाचरित्राचे स्वरूप काही प्रमाणात महाभारतासारखे समजायला हवे. महाभारताच्या उत्तरी व दक्षिणी अशा दोन प्रमुख परंपरा. तरीही तंतोतंत एकमेकाशी जुळतील अशी हस्तलिखिते फार थोडी. अशा वेळी सर्वच हस्तलिखिते, सर्व परंपरा विचारात घेणे भाग असते. प्रमाण म्हणून आपण एक पाठ मान्य करू, पण इतर सारा प्रक्षेप क्रमवार परिशिष्टात अगर तळटीपांत यायला हवाच. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीसाठी अठराव्या शतकाव्या उत्तरार्धापर्यंतची हस्तलिखिते संपादकांनी विचारात घेतलेली आहेत. ढेरे ह्यांचे हेच म्हणणे आहे. सर्व अन्याय, सर्व परंपरा विचारात घेण्याची गरज त्यांना भासते.
अशी गरज नव्या संशोधकांना भासण्याची कारणे आहेत. कारण चिकित्सा नव्या टप्प्यावर जात आहे. जर अनेक महानुभाव ग्रंथकार, नागदेवाचा गुरुबंध म्हणून रामदेवाचा उल्लेख करू लागले व रामदेवांचा शिष्य म्हणून विवेकसिंधुकार मुकुंदमहाराजाचा उल्लेख करू लागले तर मुकुंदराजाचे गुरू रामचंद्र व नागदेवाचार्यांचे गुरुबंधू रामदेव दादोस हे एकच की काय, चक्रधर व हरिनाथ एकच की काय, असे प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. रामदेव दादोसा हे विद्यावंत व भक्त वेदांती होते काय, हा प्रश्न निर्माण होणारच. चांगदेव राऊळ, गंडमे राऊळ अशी नावे पाहिली की शैवाच्या रावळ शाखेशी संप्रदायाचा संबंध काय हा प्रश्न येणारच. कोणताही संप्रदाय हवेत अधांतरी असा नसतो. भोवतालच्या वातावरणातूनच सर्वांनीच उचल केलेली असते. तेव्हा इतर धार्मिक दर्शनांशी महानुभाव अनुबंध कोणता, हा प्रश्न निर्माण होणारच. असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. लीळाचरित्रात नसणाऱ्या बाबींचे उल्लेख जर बाइदेवबासाच्या 'पूजावसारा'त येऊ लागले तर प्रश्न निर्माण होतातच, हे प्रसंग लीळाचरित्रात का आलेले नाहीत ? लीळाचरित्रात लीळा निवडताना डोमेग्रामला प्राधान्य का आलेले नाही ? अज्ञात लीळा म्हणून ज्या सापडतात त्यांना उत्तरकालीन दंतकथाच समजायचे, की ह्यापेक्षा काही अधिक महत्त्व ह्या लीळांना आहे? गोविंदप्रभू चरित्रात चक्रधरोत्तर हकिकतींना प्राधान्य का आले ? त्या पूर्वीच्या प्रदीर्घ जीवनातील लीळांची वर्णने का नाहीत ? स्वतः गोविंदप्रभूचा संप्रदाय कोणता? ह्या साऱ्या प्रश्नांची नवे संशोधक कोणती उत्तरे देतात ते आता पाहावयाचे आहे.