पान:परिचय (Parichay).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
शक्तिपीठाचा शोध । २५
 

असते. या उत्पत्तीच्या उपास्यदेवता नर आणि मादी रूपांत दिसतात. नररूपाने महालिंगदेव असतो. वृषभ, अश्व, शंग, द्यौ ही त्याची रूपे आहेत. नारीरूपाने महायोनिदेवता असते. घट, कमल, पृथ्वी, वारूळ, गौ ही सारी या देवतेची प्रतीके आहेत. ब्रह्मा, विष्णु, आणि शिव हे तिघे मूळ रूपात लिंगदेवच आहेत. कदाचित ढेरे सर्व देवीरूपे मुळात योनिमातृका आहेत, हे सांगणारा पुरावा तपशिलाने गोळा करतील. शिवलिंग पाहताना हात-पाय व डोके नाही, हे विसरायचे असते. ती देवता लिंगस्वरूप आहे. कामाख्या अशी सर्वस्वी योनिस्वरूप आहे. घट पाहताना म्हणजे देवीचे तांदळे पाहताना उरलेले शरीर पाहायचे नसते. शिरोहीन योनिदेवता पाहताना शिर पाहायचे नसते. शिराच्या जागी कमळ व चक्र म्हणजे पुन्हा योनीच आहे. या मूर्ती शिरोहीन नसून योनिमयी आहेत, योनिस्वरूप आहेत, इतकेच काय ते.

 'शक्तिपीठाच्या शोधा' च्या रूपाने ढेरे एका व्यापक व मूलगामी संशोधनाला हात घालीत आहेत. पुढे येणाऱ्या त्यांच्या ग्रंथाला मी सूयश चिंतितो. पण यापुढच्या वाटचालीत त्यांना थोडे धीटही व्हावे लागेल, सावधही व्हावे लागेल, असे वाटते. देवतांचा शोध घेताना उपासकांचा व उपासनांचा शोध घ्यावाच लागतो. नाहीतर सांकलियांच्याप्रमाणे जगन्मातेला इजिप्ती देवता मानण्याची चूक होते. पण या उपासकांची केवळ वर्तमान-परंपरा पाहता येणार नाही. वर्तमानपरंपरेत सोज्ज्वळ पुत्रदात्री असणारी देवता हजार-आठशे वर्षांपूर्वी भैरवींच्या तांत्रिक उपासनेचे केंद्र असते. माहूर आणि कोल्हापूर ही अशी केंद्रे असल्याची सूचना महानुभाव वाङमयात आहे. रेणुका मूळची महानग्ना आहे, हे सांगण्यासाठी अलीकडच्या काळातील 'केदारविजय' सारखा ग्रंथसुद्धा आधाराला घेणे धोक्याचे आहे. या देवी-उपासनेच्या परंपरेकडे तीन वेगळ्या दिशांनी पाहणे भाग आहे. एक तर पौराणिकांनी आणि स्थलमाहात्म्यग्रंथांनी उभा केलेला कथासमूह असतो. दुसरे म्हणजे सर्व शाक्त तांत्रिक आपल्या प्राचीन रूपांत शैव आहेत. त्यांनी देवीपीठांना शिवशक्तिसंगम स्वरूपात शिवाला प्राधान्य देऊन विकास घडविलेला असतो. या सर्व शैवांचा व शाक्तांचा बौद्ध तंत्रपरंपरांशी संबंध आहे. शाक्त भासुरानंद शैव अभिनवगुप्तांना पूर्वाचार्य मानतात आणि अभिनवगुप्ताचे पूर्वाचार्य वसुगप्त यांच्यावर बौद्धतंत्राचा प्रभाव आहे. शाक्तांनी या शक्तिपीठांना जे शिवसंबद्ध रूप दिले आहे, ते निराळे आहे. आद्य योनिमातृकांचा उपासनाप्रवाह निराळा आहे. हे तीन धागे परस्परांत मिसळलेले असतात. ते सावधपणे हाताळणे भाग आहे. ढेरे आद्य योनिमातृका आणि शाक्तांची योनिस्वरूप शिवानी यांना एकच समजतात की काय, अशी मला शंका येते. या दोन बाबी भिन्न आहेत.
 प...२