पान:परिचय (Parichay).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४ । परिचय
 

म्हणजे पुन्हा योनीची पूजा करीत असतो. तेर येथील मृत्तिकाचित्रात हा घट स्पष्ट आहे व तो योनिरूप आहे. अनेक पौराणिक कथा उलथ्यापालथ्या करणारा आणि आर्यपूर्व उपासनांच्याकडे घेऊन जाणारा असा हा प्रवास आहे. ढेरे कोणत्या दिशेने जात आहेत, याची येथे फक्त कल्पना दिली आहे. पण या दिशादर्शनावरून इतके समजायला हरकत नाही की, ही केवळ स्थलनिश्चिती नव्हे. या पुस्तिकेत गृहीत व अनुस्यूत मीमांसेचा व्याप फार मोठा आहे.
 या योनिमातृकांच्या मूर्तीविषयी याहीपूर्वी संशोधकांनी विवेचनं केलेली आहेत. श्रीमती स्टेला कामरिश यांना या मूर्ति वैदिकी अदितीच्या वाटतात, कारण अदिती महानग्ना व उत्तानपाद आहे. डॉ. सांकलिया यांच्या मते ही मूळची इजिप्तमधील बोबो नावाची देवता असून, रोमन संपर्काच्या काळात ख्रिस्तोत्तर पहिल्यादुसऱ्या शतकांत, तिचे भारतात आगमन झाले आणि नंतर झपाटयाने या देवतेचे भारतीयीकरण झाले. अजून कुणाला ही देवता अनार्यांची भूमिरूप मातृदेवता वाटते. या नानाविध स्पष्टीकरणांच्यापैकी निर्णायकरीत्या चुकीची असेल, तर ती डॉ. सांकलियांची भूमिका आहे. सांकलियांच्यासारख्या आदरणीय श्रेष्ठांच्या विषयी हे म्हणू नये, पण म्हणणे भाग आहे की, त्यांची विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे.
 ज्या वेळी एखादी बाब प्राचीन काळात दिसत नाही (उदाहरणार्थ, ज्योतिषशास्त्रातील राशींची कल्पना) आणि पुढच्या काळात मात्र ती बाब सार्वत्रिक होते, त्या वेळी असा प्रश्न विचारता येतो की, या बाबीचा मूळ उगम कोठे आहे ? पण जी घटना भारतभर अतिप्राचीन काळापासून सार्वत्रिक आहे, तिच्याबाबत 'ती आली कुठून ?' हा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. सिंधुसंस्कृतीपासून आजतागायत भारतभर आढळणारी लिंगपूजा कुठून आली, हे विचारण्यातच अर्थ नसतो. हेच मातृदेवतांना लागू आहे. मातृदेवतांचा उगम भारतात मानवसंस्कृतीच्या आरंभाइतका जुना आहे. तितका योनिपूजनाचा पुरावाही दाखवता येतो. ऋग्वेदाच्या काळीच 'भग' ही देवता पुरुषरूपाने स्वीकारण्यात आलेली आहे. ही घटना पुरेशी बोलकी आहे. मुळात शिरोहीन योनिमातृकांना बौबोप्रमाणे समजणेच चुकीचे आहे.
 मी या योनिदेवतेला वैदिक अदितीही मानू शकत नाही. असलेच तर शिष्टांनी मान्य केलेले अदिती हे योनिमातृकेचे एक रूप मानता येईल. जुडाइस्ट परंपरेच्या धर्माने अशी एक समजूत निर्माण केली आहे की, अडाणी लोक पशुपक्षी, वृक्ष व वनस्पती, दगडधोंडे यांना देवता समजतात. ही समजूतच मुळात चुकीची आहे. आदिम समाजात पशुपक्षी वृक्षादींचे पूजन असते हे खरे आहे, पण ती देवतेची प्रतीके असतात व प्रतीक म्हणून पूज्य असतात. विकसित धर्मपरंपरासुद्धा हीच कल्पना अनुसरतात. आद्य मानवसमाजात सर्व समृद्धी आणि वैभव उत्पत्तिरूप