Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




त्यांच्याच वयाची. त्यांच्या गटात होती. आई वडिलांची ऐपत नव्हती. म्हणून तिच्या खासगी शिकवणीची फी 'अभियाना' च्या माध्यमातून भरती होती. शाळेत जाता यावं म्हणून सायकल दिली होती. या उन्हाळ्यात आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. लग्न होणार हे कानोकानी कळलं होतं, पण कुठे, कधी काहीच माहिती नव्हतं. नेमक्या त्या काळात आशा सेविका गावात नव्हत्या. तिचे आई-वडील गुपचुप दुसऱ्या गावात लग्न उरकून आले. पूजा नावाच्या दुसऱ्या मुलीबाबतही असाच प्रकार घडला. तिचे तर लग्न आहे, अशी खबरही लागली नव्हती. अचानक बातमी आली ती थेट लग्न झाल्याची. एवढ्याशा बडेवाडी गावात कुणाला खबरही न लागू देता ही दोन लग्न झाली. याचं मुलींना वाईट वाटतं आणि रागही येतो. त्यातल्या त्यात समाधान एवढंच की यापैकी सोनाली लग्न होऊनही शाळेत येते. प्रज्ञा, सारिका मात्र स्वत:चं शिक्षण पूर्ण होऊन कमावत्या झाल्याशिवाय लग्नाचा विचार करणार नाहीत. प्रज्ञाला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा, त्याची तयारी अशी सगळी माहिती तिने करुन घेतली आहे. ती त्यासाठी भरपूर अभ्यासही करते. गावात कितीतरी लोक पैसे नसल्याने योग्य उपचार घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा द्यायचं तिचं स्वप्न आहे. सारिकाला वकिलीचं शिक्षण घेऊन पुढे न्यायाधीश व्हायचं आहे.
 अन्यायग्रस्त, बायका, मुलींना न्याय द्यायचा आहे. बलात्कार, बालविवाह, बायकोला मारहाण करणारे या प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे असं तिला वाटतं. अभियानाच्यावतीने बडेवडीतून रोज मानूरला शाळेत जाणाऱ्या १२ मुलींना सायकली देण्यात आल्या. 'लेक लाडकी अभियाना' ने वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तिंना विनंती करुन मुलींसाठी या सायकली दिल्या आहेत. सारिका आणि प्रज्ञालाही सायकल मिळाली. या सायकलीमुळे हा पाच किलोमीटर माळरानावरचा प्रवास सुसहय झाला आहे. मुली त्यांच्या शिकवणीसाठी पहाटे लवकर बाहेर पडतात ते थेट संध्याकाळी उशिरा परत येतात. एरवी दीड तासांची पायपीट आता सायकलमुळे २० मिनिटांवर आली आहे. वेळ वाचतो आणि व्यायामही होतो म्हणून मुली खुश आहेत. मुलींचं शिक्षणाचं स्वप्न आता सायकलीच्या चाकांवर वेगाने धावू लागलंय.