पान:निवडक अंतर्नाद.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उगाच अतिशयोक्ती करू नका.” सोसायटीचे अध्यक्ष म्हणाले. त्यांनी म्युनिसिपाल्टीकडून रीतसर प्लॅन पास करून घेतलाय. आपल्याकडे कॉपी आहे त्याची. " "डोंबलाचा प्लॅन! अहो, म्युनिसिपाल्टीची परवानगी कशी घेतात हे मी तुम्हाला सांगायला हवं का?” तावडे म्हणाले. "आपल्या सुरक्षिततेची काळजी आपणच घ्यायला हवी.” "आतल्या एकदोन भिंती उतरल्या म्हणजे काही बिल्डिंग धोक्यात येत नाही, तावडेसाहेब, बिल्डिंगला आधार कॉलम्सचा असतो, भितींचा नाही. शिवाय भिंती पाडताना तिथं योग्य असा सपोर्ट दिला जातोय. आणि आपली बिल्डिंग तशी काही जुनी म्हणता येणार नाही. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच बांधलेली आहे तेव्हा उगाच भलभलत्या कल्पना डोक्यात घेऊ नका." "एक्झॅक्टली. तावडेसाहेब उगाच राईचा पर्वत करताहेत, " सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले. "राईचा पर्वत ? मूर्खासारखं बोलू नका. मी स्वतः जाऊन बघून आलो. मधल्या दोन बीम्स पाडून त्यांना हवी तशी जागा बदलून घेताहेत. हे काम रिनोव्हेशन म्हणायचं? उद्याच्या उद्या त्यांना नोटीस देऊन रिनोव्हेशनची परवानगी रद्द करा, ” तावडे रागारागाने म्हणाले. "शांत व्हा तावडेसाहेब, सोसायटीच्या खजिनदारांनी प्रथमच तोंड उघडलं, सभ्य माणसाच्या घरात शिव्या देऊ नका, प्लीज. " "शिव्या? शिव्या कुणी दिल्या?” "तुम्ही आत्ता आपल्या सेक्रेटरींना मूर्ख म्हणालात सभेत बोलायची ही पद्धत नाही." "खड्यात गेली तुमची सभेत बोलायची पद्धत! इथं माणसाच्या जिवावर बेतलंय आणि तुम्ही सभेत बोलायच्या पद्धती काय घेऊन बसलात? दॅट स्काऊंड्रल इज प्लेईंग विथ अवर लाईव्ज, तुम्हाला कळत कसं नाही?" "तावडेसाहेब, जरा दमानं घ्या यांना सभेच्या नियमानुसार वागायचंय ना? ठीक आहे. आपण सभेच्या नियमाप्रमाणे जाऊ या, " माणके म्हणाले. "सिद्धिविनायकची रिनोव्हेशनची परवानगी रद्द करावी अशी मी सूचना मांडतो. आपण ती मताला यकूया.” माणक्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. हे तीन चोर असं सरळ ऐकणार नाहीत. पण त्यांना सोडून आणखी पाचसहाजण आहोत आम्ही त्यांचं आज काही चालणार नाही. कदाचित वाधवानी त्यांच्या बाजूला जातील. त्यांचा काही भरवसा देता येत नाही. पण तरीही आमचीच मेजॉरिटी होईल. बरं झालं आज देशमाने सभेला आले, त्यांच्या मनात येऊन गेलं. "ठीक आहे," सेक्रेटरी म्हणाले. "आपण सूचना मताला टाकूया, माणक्यांच्या सूचनेला फॉर कितीजण आहेत?” माणके आणि तावडे सोडून आणखी फक्त दोघांनी हात वर केले. वाधवानी सेक्रेटरीला सामील असतील असं माणक्यांना वाटलं होतंच, पण प्रमोदचा हात वर जाईल म्हणून त्यांनी वाट पाहिली, प्रमोदनं त्यांची नजर चुकवली. "एक-दोन-तीन-चार! चौघंजणं फॉर आहेत. ठीक सूचनेला विरोध कुणाचा आहे?” स्वतःचा हात वर करत सेक्रेटरींनी विचारलं. पाच हात वर झाले. प्रमोदचा हात वर होता पण मान खाली होती. "पाच. पाचजणांचा विरोध आहे. तेव्हा माणके तुमची सूचना फेटाळण्यात येत आहे " "यू फूल्स " तावडे संतापाने ओरडले. "तुम्ही लोकं स्वतःच्या पायावर धोंडा घालून घेताय, माणके, चला यांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. आपण उद्या कोर्टाकडे जाऊन इंजंक्शन आणूया, चला. " माणके आणि तावडे तरातरा चालते झाले. मघाशी त्यांना पाठिंबा दिलेल्या दोघांच्या चेहेऱ्यावर संभ्रम दिसत होता. प्रमोद अस्वस्थपणे बसून होता. वाधवानींनी शेजाऱ्याच्या हातावर टाळी दिली. त्यांच्या ओठावर हास्य होते. "बरं झालं तो म्हातारा गेला ते.” तावड्यांना उद्देशून मारला गेलेला हा शेरा प्रमोदच्या मनावर चरा उठवून गेला. मीटिंगमध्ये पुढं काय झालं त्यात प्रमोदला रस राहिला नाही. आपण केलं ते बरोबर की चूक हे त्याचं त्यालाच समजत नव्हतं. माणके म्हणाले ते खरं तर नसेल ना? घरी आल्यावर मीटिंगमध्ये काय झालं असं माधुरीनं विचारलं. "उद्या सांगतो" असं सांगून तो अंथरुणावर पडला, डोंगरे आणि पांडे येऊन गेले त्याला फक्त अठ्ठेचाळीस तास झाले होते. एवढ्या थोड्या वेळात बरंच काही घडून गेलं होतं. प्रमोदच्या भोवतालचं जग तेच होतं. पण प्रमोद आता दुसऱ्या जगात वावरत होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्याला त्याचा सहा खोल्यांचा प्रशस्त ब्लॉक, दाराशी गाडी, हाताशी भरपूर पैसा दिसत होता. सुवर्णमृगाच्या झळाळत्या कांतीचा मोह जबरदस्त होता. - पांडेंकडचा फोन रात्री बारा वाजता वाजला. ते जागेच होते. "पांडेसाहेब, मै नवरे बोल रहा हूँ.” "हाँ, बोलो' पांड्यांचा आवाज जड येत होता, त्यांचा ड्रिंकचा पाचवा राऊंड चालू होता. "पार्वती सदन सोसायटीच्या मीटिंगचा रिपोर्ट द्यायला फोन केला साहेब. " "क्या हुआ?" "आपल्या रिनोव्हेशनची परवानगी इंजंक्शन करण्यासाठी ठराव आणला होता मीटिंगमध्ये, पण तो पास नाही झाला. " "बहोत अच्छा! काही पैसे सोडावे लागले?" "नाही साहेब. आपण दोन दिवसापूर्वी जाऊन देशमाने आणि वाधवानींना कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ना? त्यांची जागा आपण घेणार आहोत ही हूल पुरेशी होती. आपण जागा घेतली तर निवडक अंतर्नाद ८९